Maharashtra Weather Update : उष्णतेचं प्रमाण गेल्या काही दिवसात कमालीचं वाढलं आहे. त्यातच आज हवामान विभागाने (IMD), शुक्रवारी महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही भागांत अवकाळी पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहील. त्यामुळे नागरिकांना दुपारी 11 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच, पुरेसं पाणी पिणे आणि हलके कपडे घालण्याची सूचना आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण-दमट वातावरण
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस राहील. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल अशी शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी
दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
