मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल करुन संबंधित आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली होती. ज्यावर आज (५ एप्रिल) हायकोर्टाने निर्णय देताना सीबीआय चौकशीचे आदेश दिले.
ADVERTISEMENT
कोर्टाच्या या आदेशानंतर अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमाववं लागलं. पण या सगळ्यात जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण याविषयी बरीच चर्चा सुरु झाली आहे. आता त्याचबाबत आम्ही आपल्या सविस्तर माहिती देणार आहोत.
जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?
जयश्री पाटील या पेशाने स्वत: एक वकील आहेत. पण त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या स्वातंत्र्य सेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. एल. के. पाटील हे भारताच्या घटनात्मक समितीचे सदस्य देखील होते. त्यामुळे मुळातच जयश्री पाटील यांना लहानपणापासून कायद्याविषयी अनेक गोष्टी ठाऊक होत्या. यातूनच कायद्याचं शिक्षण घ्यावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी लॉमध्ये पीएचडी देखील केली.
पीचएडी केल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली. तेव्हापासून आजवर गेली अनेक वर्ष जयश्री पाटील या कोर्टात स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. याशिवाय त्यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून देखील काम केलं आहे. जवळजवळ सात वर्ष त्या या पदावर होत्या.
जयश्री पाटील या प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. गुणरत्न सदावर्ते हे देखील गेले अनेक वर्ष आपल्या वकिला पेशासाठी ओळखले जातात. त्यांच्याच जयश्री या पत्नी आहेत.
जयश्री पाटील यांच्या याचिकेत नेमकं काय म्हटलं होतं?
जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. परमबीर सिंग यांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टाकडे सोपवलं. त्याचवेळी जयश्री पाटील यांनीही या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली होती.
जयश्री पाटील यांची याचिका काय होती? ज्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला
अॅड. जयश्री पाटील या कोर्टाच्या आदेशानंतर काय म्हणाल्या?
‘आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. १५ दिवसात अहवाल द्यायचा आहे. आज मला हे सांगायचं आहे की, अनिल देशमुख गृहमंत्री असले तरीही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कोर्टाने प्राथमिक चौकशी दिली आहे. अनिल देशमुख हे बडे नेते असतील, शरद पवारांचा त्यांच्यावर वरदहस्त असाला तरीही तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाहीत.’ असं जयश्री पाटील म्हणाल्या होत्या.
अॅड. जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याआधी भ्रष्टाचाराविरोधी कायद्याखाली संबंधित मंत्री आणि व्यक्तीस अट करण्यात यावी. अशी मागणी जयश्री पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत केली होती.
Anil Deshmukh: काय-काय घडलं, कसे अडकत गेले अनिल देशमुख? पाहा सविस्तर रिपोर्ट
परमबीर सिंगाच्या लेटरबॉम्बमुळे अनिल देशमुखांना गमवावं लागलं गृहमंत्री पद
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार सचिन वाझे यांना १०० कोटींची वसुली करण्याचा आदेश हा अनिल देशमुख यांनी दिला होता. परमबीर सिंग यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. तो लेटरबॉम्ब हाच अनिल देशमुख यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ADVERTISEMENT