नवी दिल्ली: लक्षद्वीप (Lakshadweep) हा भारतातील (India) सर्वात छोटासा केंद्रशासित प्रदेश आता अचानक चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथील कारभाराबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रामागचं कारण म्हणजे लक्षद्वीप येथे नुकत्याच नेमलेले नवे प्रशासक प्रफुल खोडा पटेल (Praful Khoda Patel) यांनी घेतलेले काही वादग्रस्त निर्णय.
ADVERTISEMENT
लक्षद्वीपचे दिवंगत प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनानंतर गुजरातचे माजी आमदार प्रफुल खोडा पटेल यांची नवे प्रशासक म्हणून काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. पण याच नव्या प्रशासकांनी असे काही निर्णय घेतले आहेत की, ज्यामुळे आता त्यांच्याऐवजी नवे प्रशासक नेमण्याची मागणी केली जात आहे.
लक्षद्वीप इथे पी. पी. मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनीच नवे प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच गंभीर प्रश्नाची दखल घेत शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे.
PM Cares चा निधी वापरा, Central Vista चं काम थांबवा, शरद पवार-सोनियांसह प्रमुख विरोधी पक्षांचं मोदींना पत्र
या पत्रात शरद पवार यांनी असं म्हटलं आहे की, स्थानिक मच्छिमारांची किनारपट्टीवरील साहित्यसामुग्री कसलीही नोटीस न देता उद्ध्वस्त करणे, अंगणवाड्या बंद करून लोकांना बेरोजगार करणं. तसंच तिथे दारूबंदी असताना नव्याने त्याबाबतची परवानगी देणं, स्थानिक डेअऱ्या बंद करून त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू करणं यासारखे अनेक वादग्रस्त निर्णय घेतले जात असल्याचं पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
याशिवाय लक्षद्वीपमध्ये प्राणी संरक्षण कायदा बनविला जात असून, यातून गोवंश हत्येवर बंदी घातली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे लक्षद्वीप येथील स्थानिक नागरिकांमध्ये नव्या प्रशासकाविरोधात प्रचंड नाराजी असल्याचंही पवारांनी पत्रात नमूद केलं आहे.
येथील प्रशासन लोकांच्या खाण्या-पिण्याचा सवयीत बदल करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हस्तक्षेप करत असून तिथे सध्या मनमानी पद्धतीचा कारभार सुरु आहे. अशा प्रकारच्या कारभारामुळे लक्षद्वीप येथील प्रथा-परंपरांना धक्का बसत असल्याचं म्हणत शरद पवार यांनी देखील या सगळ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट आणि काही अनुत्तरीत प्रश्न
दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील या सगळ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत असं म्हटलं आहे की, ‘लक्षद्वीप हे महासागरातील भारताचे रत्न आहे. मात्र सत्तेतील अज्ञानी व्यक्ती त्याला नष्ट करीत आहेत. मी लक्षद्वीपच्या लोकांच्या साथीने ठामपणे उभा आहे.’
दरम्यान, आता शरद पवारांच्या पत्रानंतर आणि राहुल गांधींच्या ट्विटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्या जागी दुसरा प्रशासक नेमणार की, दोन्ही नेत्यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT