महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे राजकीय भूकंप झाला आहे. सरकार कधीही कोसळू शकतं अशा स्थितीत आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ असे ५१ आमदार आहेत. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, अशी या सगळ्यांची भूमिका आहे. हे आव्हान त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच एक आवाहन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून हे म्हटलं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही परत या आपण समोरासमोर बसून बोलू, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील असं एक भावनिक आवाहन केलं आहे. तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून मला काळजी वाटते असंही त्यांनी म्हटलं आहे. तर शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही आहोत असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात हे सत्तानाट्य सुरू असताना एक फोटो सध्या बंडखोरी केलेल्या आमदारांकडून व्हायरल केला जातो आहे. हा फोटो आहे पेशवाईतला. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या दोघांनी एकत्र येऊन २० वर्षे कारभार केला असं या फोटोखाली लिहिण्यात आलं आहे. १७७४ ते १७९४ हा कालखंडही या फोटोत देण्यात आला आहे. हा फोटो शिवसेनेच्या आमदारांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो आहे. त्यामुळे या फोटोची चांगलीच चर्चा आणि नाना फडणवीस तसंच महादजी शिंदे यांची चर्चाही चांगलीच रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप आहे हे पहिल्या दिवसापासून बोललं जातं आहे. आपल्या मागे महाशक्ती आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः सहा राष्ट्रीय पक्षांची नावं घेत यामध्ये भाजपच आहे असा आरोप केला होता. एकनाथ खडसे यांच्या बंडामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. भाजपला शिवसेनेतल्या या बंडाचा खूप फायदा होणार यात काहीही शंकाच नाही. अशात आता हा व्हायरल होणारा फोटो बरंच काही सांगून जातो आहे. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी एकत्र येऊन २० वर्षे कारभार केला तसंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे देखील चालवू शकतात हे यातून सांगितलं जातं आहे.
नाना फडणवीस कोण होते?
पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस यांचा लौकिक होता. त्यांचा जन्म साताऱ्याचा, लहानपणापासून नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांना राज्यकारभाराचं शिक्षण मिळालं. नाना फडणवीस यांना थोरल्या माधवराव पेशव्यांनी २० व्या वर्षी फडणिशीची वस्त्रं दिली होती. हे पद नाना फडणवीस यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि मुत्सदीपणाने सांभाळालं.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले.
नाना फडणवीस यांनी पानिपतचं युद्ध प्रत्यक्ष पाहिलं होतं. यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज अशा बातम्या आणणऱ्या गुप्तहेरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना देशातल्याच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.
प्रत्येक ठिकाणच्या आतल्या बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.
कोण होते महादजी शिंदे?
महादजी शिंदे यांचं नाव मराठ्यांच्या इतिसाहात अत्यंत अभिमानाने घेतलं जातं. इंग्रजांनीही त्यांना द ग्रेट मराठा ही उपाधी दिली होती. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा साम्राज्याला नवी उभारी मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलं. १७४५ ते १७६१ या काळात महादजी शिंदे यांनी सुमारे ५० लढायांचे नेतृत्व केलं. १७७३ मध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला. रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला आणि रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले. या बारभाईंमध्ये महादजी शिंदे नाना फडणवीसांची भूमिका महत्त्वाची होती.
आज महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात राजकीय भूकंप झालेला असताना बंडखोर आमदारांकडून या दोघांचा फोटो व्हायरल केला जातो आहे. या दोन कर्तृत्वान असामींची चर्चा ट्विटर आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा रंगली आहे.
ADVERTISEMENT