मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांना का टार्गेट करत आहेत?

मुंबई तक

04 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागच्या एक महिन्यापासून चर्चेत आहेत. गुढी पाडव्याला त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा पुढे आणला. तसंच १२ तारखेला जी उत्तर सभा ठाण्यात घेतली त्या सभेत तर त्यांनी याच मुद्द्यावरून अल्टिमेटमही दिला. अशात त्यांनी आणखी एक गोष्ट केली जी तिन्ही भाषणांमध्ये आणि ३ मे रोजी […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागच्या एक महिन्यापासून चर्चेत आहेत. गुढी पाडव्याला त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा पुढे आणला. तसंच १२ तारखेला जी उत्तर सभा ठाण्यात घेतली त्या सभेत तर त्यांनी याच मुद्द्यावरून अल्टिमेटमही दिला. अशात त्यांनी आणखी एक गोष्ट केली जी तिन्ही भाषणांमध्ये आणि ३ मे रोजी केलेल्या आवाहनात कायम होती. ती गोष्ट होती शरद पवारांना टार्गेट करणं.

हे वाचलं का?

३ मे रोजीच्या निवेदनात काय म्हणाले राज ठाकरे शरद पवारांबाबत?

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की कै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे.

या निवदेनात मुख्यमंत्र्यांना उद्देशून जे लिहिलं आहे त्यात शरद पवारांचा उल्लेख बेगडी धर्मनिरपेक्षतावादी असा करण्यात आला आहे. आपल्या आधीच्या म्हणजेच औरंगाबाद आणि त्याआधीच्या भाषणांमध्ये शरद पवारांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं आहे.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी (१ मे २०२२)

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. ते नेहमी फक्त शाहु-फुले आणि आंबेडकरांचा उल्लेख करतात. नक्कीच महाराष्ट्र हा त्यांचा आहेच, परंतू पहिल्यांदा येतात ते आपले छत्रपती महाराज. परंतू शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेत नाही. त्यांच्या सभांमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो कधीच दिसत नाहीत. मी इथे कोणत्याही ब्राम्हणांची बाजू घ्यायला आलेलो नाही. परंतू महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींमध्ये तुम्ही विष कालवलं आहेत.

बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. केवळ ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्रास दिला गेला. मी कधीही जात पाहून व्यक्तीकडे जात नाही. जात पाहून वाचत नाही. रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांच्याकडे काय ब्राह्मण म्हणून पाहाणार काय? लोकमान्यांनी आपल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा ठेवलं. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत. हे सत्तेत असताना त्यांनी जेम्स लेनला का भारतात आणलं नाही”

१२ एप्रिलच्या उत्तर सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

“शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती पुण्यात. त्यावेळी त्यांचं वय पाहून मी फार खोलात गेलो नाही. शरद पवार जेव्हा जेव्हा भाषण करतात राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून त्यावेळी ते म्हणतात हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे. मान्यच आहे. पण त्याआधी हा महाराष्ट्र सर्वप्रथम कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे.”

छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केल्यावर ध्वज कोणता हाती घेतला तो भगवा झेंडाच होता. भागवत धर्माचा, हिंदू धर्माचा, मंदिरांवरचा भगवा झेंडाच छत्रपतींनी निवडला. हिरव्या झेंड्याविरोधातली भगव्याची ती लढाई होती. हे कधी शरद पवारांना दिसलं नाही का? स्वतः शरद पवार हे नास्तिक आहेत त्यामुळे ते धर्माकडे बघताना ते त्याच दृष्टीने पाहतात. एखादाच दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळू शकेल ज्यात शरद पवारांनी हात जोडलेले दिसतील. कदाचित तोही मिळणार नाही. शरद पवार हे धर्मबिर्म काही मानत नाहीत. देव वगैरे काही मानत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात.

२ एप्रिलच्या सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले होते राज ठाकरे?

हिंदू हा हिंदू-मुस्लिम दंगलीत हिंदू होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही की, आपण कोण आहोत. तो ज्यावेळी मराठी होतो, त्यावेळी तो पंजाबी, तामिळी, गुजराती… ज्यावेळी तो मराठी होतो. त्यावेळी मराठा, ब्राह्मण, कोळी, आगरी… काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला गेला. इथे बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. आम्ही इतिहास वाचतच नाहीये. ज्या शिवरायांनी एक व्हा असं सांगितलं. त्याच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर पडणार नाही, तर हिंदू कधी होणार? असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांवर शरसंधान केलं होतं.

आंब्याच्या झाडावर दगड मारले जातात, बाभळीच्या नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

३ मे चं निवेदन, १ मे ची सभा, १२ एप्रिलची उत्तर सभा आणि २ एप्रिलची सभा या सगळ्या सभांमध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी, जात-पात पसरवणारे असं म्हटलं आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, आंब्याच्या झाडालाच सगळे दगड मारतात बाभळीच्या झाडाला नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. तसंच राज ठाकरेंचं भाषण म्हणजे मनोरंजन असतं असंही त्या म्हणाल्या होत्या.

स्वतः राज यांनीही काय केलं होतं वक्तव्य?

राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या ७५ च्या निमित्ताने जो कार्यक्रम मुंबईत झाला होता त्या कार्यक्रमात एक गोष्ट सांगितली होती. “महाराष्ट्रात काहीही घडलं तर त्यामागे एक कुजबूज सुरू होते की यामागे नक्कीच शरद पवारांचा हात असला पाहिजे अशी चर्चा लगेच सुरू होते” असं म्हटलं होतं.

शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत किंवा ते केंद्रस्थानी नसले तरीही केंद्र आपल्याकडे कसं खेचायचं हे त्यांना चांगलंच अवगत आहे. अशात राज ठाकरेंनी निवडलेली वाट हिंदुत्वाची आहे, या वाटेवर शरद पवारांना टार्गेट केलं की आपला मार्ग सुकर होईल असं राज ठाकरें वाटत असावं.

त्यामुळेच आपल्या भाषणांमध्ये राज ठाकरे शरद पवारांना टार्गेट करत असल्याचं असल्याचं दिसून येतं आहे. यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही होते आहे. मात्र ही टीका ते इतक्यात थांबवतील असं आत्ता तरी वाटत नाही.

    follow whatsapp