मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजु साप्ते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करताना राजु साप्ते यांनी युनिअन मधील लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण कंटाळलो असल्याचं सांगितलं. साप्ते यांनी राकेश मौर्य यांचं आपल्या व्हिडीओत नाव घेतलं आहे. साप्ते यांच्या निधनानंतर मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर आक्रमक झाले असून त्यांनी यापुढे असे प्रकार सुरु राहिले तर आम्ही हात-पाय तोडून गळ्यात बांधू अशी धमकी दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत अमेय खोपकर?
उच्च न्यायालययाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचं नाही. मात्र भविष्यात जर कोणत्याही निर्मात्याला किंवा दिग्दर्शक-तंत्रज्ञांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर त्यांनी मनसेशी संपर्क साधावा. भविष्यात कोणत्याही युनियनच्या लोकांनी निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना सेटवर जाऊन त्रास दिला तर आम्ही हातपाय तोडून गळ्यात बांधल्याशिवाय राहणार नाही आणि ही धमकीच समजा.
आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओत काय म्हणाले राजू साप्ते?
आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जातोय. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीयेत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या लेबर लोकांना भडकवत आहे. यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीयेत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण राकेश मौर्या लेबर लोकांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं सांगत मला न्याय मिळावा.
दरम्यान राजू साप्तेंच्या आत्महत्येनंतर मराठी सिने आणि टीव्ही क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
धक्कादायक ! मराठी कलादिग्दर्शक राजु साप्ते यांची आत्महत्या
ADVERTISEMENT