मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी एकनाथ शिंदे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत अशा या चर्चा आहेत. शिवसेनेत जी बंडाची ठिणगी पडली त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागली गेली आहे. अशात दसरा मेळावा एकनाथ शिंदे हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा चांगल्याच होत आहेत. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
उदय सामंत यांनी दसरा मेळाव्याबाबत काय म्हटलं आहे?
मुंबईचा दसरा मेळावा हा ज्यांनी परवानगी मागितली त्यांचाच होणार. आम्ही शिवसेना म्हणूनच काम करतो आहोत. आम्ही कुठलेही गट पाडलेले नाहीत. शिवसेना ज्यांच्यामुळे संपत चालली होती त्यांना मागे सोडून आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करतो आहोत असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी?
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते दसरा मेळावा घेणार आहेत की नाही? हा विषय सर्वस्वी त्यांचा आहे. मला त्याबाबत कल्पना नाही. एवढंच काय उद्धव ठाकरे हेदेखील दसरा मेळावा घेणार आहेत का? याची मला कल्पना नाही. दसरा मेळाव्याच्या संमतीबाबत मी गृहमंत्री म्हणून इतकंच सांगेन की जे काही नियमात असेल ते होईल. नियमबाह्य असं काहीही होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मेळावा कुणाचा होणार याबाबत काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही.
शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा दसरा मेळावा होणार?
मागची दोन वर्षे कोरोनामुळे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा शिवसेनेने दसरा मेळावा शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर घेतला जाईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानुसार महापालिकेकडे अर्जही करण्यात आला आहे. मात्र महापालिकेने अद्याप संमती दिलेली नाही. अशात आता एकनाथ शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा प्रश्न उपस्थित होतोच आहे शिवाय चर्चिलाही जातो आहे.
२१ जूनला राज्यात झालं सर्वात मोठं बंड
२१ जूनला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यांना शिवसेनतल्या ४० आमदारांची साथ लाभली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी शिवसेना आम्हीच आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना दुभंगली असून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. पहिला गट आहे तो उद्धव ठाकरे गट आणि दुसरा आहे तो एकनाथ शिंदे गट. महाराष्ट्रात जे बंड झालं त्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला. शिंदे गटाकडून पक्षाचं चिन्हही आपलंच आहे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सांगितलं जातं आहे. अशात हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहचला आहे.
यंदाचा दसरा मेळावा हा कोरोनाचं संकट नसल्याने शिवाजी पार्क मैदानात घेतला जाणार आहे. मात्र हा मेळावा उद्धव ठाकरेंचा होणार की एकनाथ शिंदेंचा याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंपासूनच दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली आहे. विचारांचं सोनं लुटायला चला अशा घोषवाक्यासह हा दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो. शिवसेनेच्या पक्ष प्रमुख पदी असलेली व्यक्ती हा मेळावा घेते. बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत तेच या मेळाव्याच्या अग्रस्थानी होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हा मेळावा घेऊ लागले. आता यंदा हा मेळावा कोण घेणार हा प्रश्न मात्र चांगलाच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT