अकोला: देवेंद्र फडणवीसच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते. अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला आहे. यासोबतच जिल्ह्यातील मुर्तीजापुर, बाळापुर आणि अकोला येथील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश आहे. राज्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात कार्यकर्तेसुद्धा राहणार नाहीत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तर केंद्रात झालेल्या मंत्रिपदाच्या फेरबदलात कोणालाही डच्चू देण्याचा प्रयत्न करण्यात आला नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांची लोकसभा निवडणूक लढण्याच्या चर्चेला ब्रेक
काही दिवसांपूर्वी भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये नितीन गडकरी यांना डच्चू देऊन देवेंद्र फडणवीस यांना समितीमध्ये जागा देण्यात आली होती. तेव्हापासून फडणवीस लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत होती. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघ निवडला जाणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? अशा प्रश्न निर्माण झाला होता. नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचीही चर्चा होती. परंतु आता चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व चर्चांणा ब्रेक लावला आहे.
ब्राह्मण महासंघानं पत्र लिहून केली होती विनंती
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली होती. या मागणीमुळे पुण्यातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि फडणवीस यांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करेल असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांची निवड अत्यंत मोलाची असून त्यांनी दिल्लीतील राजकारणाची सुरुवात पुण्यातून करावी, अशी इच्छाही महासंघाने पत्रात व्यक्त केली होती.
नितीन गडकरींना डच्चू तर देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय समितीतून डच्चू देण्यात आला होता, तर देवेंद्र फडणवीसांना संसदीय समितीमध्ये घेण्यात आले आहे. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय समितीतून हटवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही बाहेर फेकले गेले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना बोर्डावरुन हटवण्यात आले आहे, तर बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरींना काढून देवेंद्र फडणवीसांना संधी दिल्याबद्दल राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.
ADVERTISEMENT