महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर

मुंबई तक

• 04:50 PM • 26 Apr 2021

महाराष्ट्रात Lockdown 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर काय होणार हा प्रश्न आपल्याला सगळ्यांच पडला आहे. महाराष्ट्रातला लॉकडाऊन संपणार की वाढणार? हा तो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 14 एप्रिलपासून लावण्यात आला असला तरीही […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात Lockdown 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर काय होणार हा प्रश्न आपल्याला सगळ्यांच पडला आहे. महाराष्ट्रातला लॉकडाऊन संपणार की वाढणार? हा तो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 14 एप्रिलपासून लावण्यात आला असला तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी, मिनी लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका देशाला बसला आहे आणि सर्वाधिक महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊन आणखी किमान 15 दिवस तरी असण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही मुंबई तकशी बोलताना हेच मत व्यक्त केलं आहे.

हे वाचलं का?

Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?

काय म्हणाले आहेत शशांक जोशी?

महाराष्ट्रात लॉकडाऊन इतक्यात उघता येणार नाही. मुंबईत सध्या रिकव्हरी चांगली होताना दिसते आहे मात्र महाराष्ट्रात असं चित्र नाही. महाराष्ट्रातले 13 ते 14 जिल्हे आहेत जिथे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र महाराष्ट्रातलं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. आणखी किमान 15 दिवसांचे निर्बंध हे असतील असं मला वाटतं. त्याबाबत आता सरकार विचार करून निर्णय घेईल. जेव्हा अनलॉक होईल तेव्हा मात्र मास्क घातला नाही, सॅनेटायझेशन केलं नाही किंवा अंतर बाळगलं नाही तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त दंड घेतला जावा. महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो.

तर टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनीही हेच संकेत दिले आहेत की लॉकडाऊन आणखी वाढू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला जो संदेश काही दिवसांपूर्वी दिला त्यामध्ये त्यांनी एक बाब नमूद केली होती. ती बाब ही होती की कोरोनाची लढाई आपल्याला लढत असताना लॉकडाऊन हा सगळ्यात शेवटचा पर्याय ठेवण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. त्या गाईडलाईन्समध्ये कुठे लॉकडाऊन लागू शकतो त्याबद्दलचं चित्र स्पष्ट करण्यात आलं.

Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?

केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स काय सांगतात?

जिल्ह्यांचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट आठवड्यापेक्षा १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे लॉकडाऊन लावण्यात यावा

ऑक्सिजन किंवा आयसीयू बेडचं प्रमाण 60 टक्के किंवा त्यावरचं असेल तर तिथे लॉकडाऊन लावण्यात यावं

मायक्रो कंटेन्मेंट झोनवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात यावं

या बाबी केंद्राने स्पष्ट केल्या आहेत. या निकषांमध्ये महाराष्ट्रातले अनेक जिल्हे येतील त्यामुळे तूर्तास तरी 1 मे रोजी सकाळी लॉकडाऊन संपेल किंवा निर्बंध शिथील होतील याची सूतराम शक्यता नाही. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर 15 दिवसांचा लॉकडाऊन करावाच लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय आहे सरासरी टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट?

मुंबई-11.86 टक्के

ठाणे- 12.81 टक्के

पुणे -17.95 टक्के

नागपूर-31.52 टक्के

चंद्रपूर- 32 टक्के

नाशिक- 27.27 टक्के

औरंगाबाद- 15.44 टक्के

लातूर – 15 टक्के

बीड – 12.85 टक्के

महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधील टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटचा विचार केला तर कमीत कमी दहा जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लॉकडाऊन संपेल अशी स्थिती नक्कीच नाही. जर आत्ताच्या घडीला अनलॉक केलं तर केसेस पुन्हा वाढू शकतात. टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट हा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे ही बाब चिंतेची आहे.

Record! महाराष्ट्रात एका दिवसात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण

तिसरी लाट येऊ शकते का? शशांक जोशी म्हणतात..

तिसरी लाट राज्यात येऊ नये यासाठी आपण प्रय़त्न केलेच पाहिजेत. तसंच मास्क आणि लसीकरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या पाळल्या नाहीत सुरक्षित अंतर ठेवलं नाही तर तिसरी लाट नक्कीच येऊ शकते. घाईघाईन जर सगळं खुलं केलं तर ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा एकदा तिसरी लाट येऊ शकते. जगातल्या काही देशांमध्ये सध्या तिसरी लाट, चौथी लाट आली आहे. तशीच ती देशात किंवा महाराष्ट्रातही येऊ शकते. ती लाट येऊच नये या दृष्टीने यंत्रणा राबवली पाहिजे. तसंच समजा ती लाट आलीच तरीही तिचं स्वरूप सौम्य असेल याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. असं मत शशांक जोशी यांनी मांडलं आहे.

एकंदरीतच सगळ्या शक्यता लक्षात घेतल्या तर महाराष्ट्रात लॉकडाऊन इतक्यात संपेल अशी चिन्ह नाहीत. महाराष्ट्र सरकार याबाबत काय घोषणा करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

    follow whatsapp