पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी परिसरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरज जाधव या तरुण शेतकऱ्याने सरकारच्या शेतीविरोधी धोरणांना कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली आहे. सूरज जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून सूरजने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये सूरजने यापुढे शेतकऱ्याच्या जन्माला कधीच येणार नाही असं म्हटलं आहे. शेतकरी हा नामर्द आहे. सरकारही कधीच शेतकऱ्याचा विचार करत नाही असं म्हणत सूरजने विषारी औषध प्यायलं.
सूरजच्या मृत्यूनंतर स्थानिक भागामध्ये महावितरणच्या वारंवार वीजतोडणीला कंटाळून सूरजने ही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पंढरपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. परंतू या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सूरज जाधव हा अल्पभूधारक शेतकरी होता. शेतीतून मिळणारं उत्पादन कमी व्हायला लागल्यानंतर त्याने जोडधंदा म्हणून गोपालन सुरु केलं.
सूरजने भांडवल उभं करुन ३५ ते ४० गाई घेत दुधाचा व्यवसाय सुरु केला. परंतू दुधाचे दर सतत वरखाली होत राहणं, गाईंच्या खाद्याचा खर्च, सरकारची धोरणं याचा ताळमेळ सूरजला लागत नव्हता. यातून आलेल्या नैराश्यामुळेच सूरजने आत्महत्या केल्याची माहिती मगरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सूरजच्या आत्महत्येनंतर मगरवाडी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. सूरजला आत्महत्या का करावी लागली याचा विचार सरकारने करुन यावर पावलं उचलावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.
ADVERTISEMENT