संपूर्ण देशासह महाराष्ट्रही सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मुख्य शहरांसह ग्रामीण भागांमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत सोलापूरच्या मोहोळ गावातील घाटणे गावातील सर्वात तरुण सरंपच असा मान मिळवलेल्या ऋतुराज देशमुखने अनोखी किमया साधली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने “ऋतुराजने बी पॉजिटीव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटीव्ह” ही मोहीम राबवली. बघता बघता गावकऱ्यांनी ऋतुराजला साथ दिली आणि गावातली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊन सध्या हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
ADVERTISEMENT
मार्चपर्यंत घाटणे गावात कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती. मात्र एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यापासून गावात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला लागली. गाव कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने सरपंच ऋतुराज अनोखी मोहीम हाती घेतली. ‘मुंबई तक’ने यासंबंधी ऋतुराजशी संपर्क साधत या मोहीमेबद्दल माहिती जाणून घेतली.
घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी ग्रामस्थांना केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त करू शकतो, असेही देशमुख म्हणाले.
घाटणे गावात सरपंच ऋतुराज देशमुख यांनी राबवलेल्या योजना –
-
गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्यांच्या आवश्यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या
-
गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले
-
गावात घरोघरी जाऊन आशा ताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी केली जात असून त्यात त्याची ऑक्सिजन लेव्हल, तापमान चेक केले जाते
-
प्रत्येक कुटुंबाला एक “कोरोना सेफ्टी किट’ दिले असून त्यात व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण उपलब्ध करुन दिलं.
-
बाहेर गावातून राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा केला प्रयत्न गावकऱ्यांनी केला.
-
सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष किंवा मिनी कोव्हिड सेंटर जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून सुरू करण्याचा यापुढे विचार गावकऱ्यांनी केला आहे.
-
करोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त केले.
एकीकडे सरकारी यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढाईत विविध उपक्रम हाती घेत असताना गावपातळीवर ऋतुराज देशमुख सारख्या तरुण सरपंचांनी राबवलेल्या उपाययोजनाही कौतुकास पात्र ठरत आहे. संपूण राज्यात जर असेच प्रयत्न झाले तर कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणांना लवकरच यश मिळेल.
महाराष्ट्रात ‘या’ चार टप्प्यात लॉकडाऊन शिथिल होईल
ADVERTISEMENT