‘त्यांचा थरकाप होतो, सातनंतर ते दिसतात का?’; आदित्य ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना चिमटा

मुंबई तक

21 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:52 AM)

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शनिवारी जळगाव जिल्ह्यात दाखल झाली होती. त्यांच्या या शिवसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. या दरम्यान आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील आणि शिंदे गटातील आमदारांवर घणाघाती टीका केली. आमदार नाही तर गद्दार अशा घोषणा यावेळी […]

Mumbaitak
follow google news

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शनिवारी जळगाव जिल्ह्यात दाखल झाली होती. त्यांच्या या शिवसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. या दरम्यान आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील आणि शिंदे गटातील आमदारांवर घणाघाती टीका केली. आमदार नाही तर गद्दार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच धरणगावातील जनतेला त्यांनी भावनिक साद देखील घातली.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांवर साधला निशाणा

‘गुवाहाटीला जाण्याआधी इकडचे जे होते, ते माझ्यासोबत गाडीत होते. काही वेळानंतर त्यांचा थरकाप होतो,’ असा टोला त्यांनी नाव घेता गुलाबराव पाटलांना लगावला. ‘सुरतेहून गुवाहाटीला गेल्यानंतर अनेकजण ट्रॅक पँट टीशर्टवर फिरत होते. काही काही सात वाजल्यानंतर दिसत नसायचे, इथं दिसतात का?’, असा सवाल त्यांनी करत मिश्किल टोला लगावला.

‘मला सांगतात फिरायला पाहिजे. तुम्ही पालकमंत्री होता, तुम्ही का फिरला नाहीत? तुमच्या खात्याचे जे काम होतं, त्यासाठी मी फिरलो. तेव्हा तुम्ही कुठे होता,’ असा सवाल आदित्य यांनी केला.

‘व्यासपीठावर मोठ्या आवाजात भाषणे करता. मग जायचंच होतं, तर समोरून छातीत खंजीर खूपसून जायचं होत. असा पाठीमागून खंजीर का खुपसला. गद्दारांनी सत्तेचा माज दाखवू नये. हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा’, असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना दिलं.

आदित्य ठाकरेंकडून पन्नास खोक्यांचा पुनरुच्चार

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दहीहंडीला पन्नास थर लावले, पण; ४० गद्दारांना सोबत घेऊन पन्नास खोके यांनी प्रत्येकावर लावले, असाही घणाघाती हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला. आम्ही तुम्हाला खांद्यावर बसविले तुम्ही मते दिली, यांनी खोके कमावले. तुम्हाला काय मिळाले? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. नाव न घेता इथले आमदार का गेले तुम्हाला सांगू का म्हणत त्यांच्यावर दडपण होतं असं आदित्य ठाकरे म्हणाले. असं आदित्य म्हणताच खालून ईडी, ईडी, असा उल्लेख झाला.

आदित्य ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

ठाकरे कुटुंबाला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला जातोय. हे तुम्ही होऊ देणार आहात का? तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार का ? अशी भावनिक साद धरणगाव येथे उपस्थित कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी घातली. यादरम्यान धरणगाव येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दौऱ्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे फाडण्यात आले होते बॅनर्स

गुलाबराब पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडल्याने त्यावरून धरणगावात तणाव निर्माण झाला होता.

    follow whatsapp