राज्यात 13 जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं, पण या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यात विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार कमी पडल्याची चर्चाही होत आहे. आता यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या कामाचा दाखला देत कान टोचले आहेत. अजित पवारांबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रोखठोक भूमिका घेत नसल्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असते. अधिवेशनातही अजित पवारांच्या नरमाईच्या भूमिकेनं प्रश्न उपस्थित झाले. त्यात आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 13 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यावर मवाळ भूमिका घेताना दिसले. यावरूनच शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून नाराजी व्यक्त केली आहे.
13 जणांचा मृत्यू, सामना अग्रलेखात काय?
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “अप्पासाहेबांचा विचार हा श्रेष्ठ आहे व खेड्यापाड्यांतील त्यांच्या श्री सेवकांनी तो स्वीकारला आहे. अप्पासाहेबांच्या विचारांची पारायणे करावीत व स्वतःचे पाप धुऊन काढावे असे काही लोक मंचावर होते. त्यांना अप्पासाहेबांच्या विचारांपेक्षा अप्पासाहेबांमुळे जमलेल्या अफाट गर्दीचा लोभ होता. या गर्दीत त्यांना मानवता कमी व मतेच जास्त दिसली. त्याचाच फटका शेवटी बसला व समोरील भाबड्या जिवांचा बळी गेला. खरं तर सरकारला कळायला हवे होते की, तापमानाचा पारा वाढतो आहे व त्या उन्हाचे चटके सहन करणे म्हणजे गरीबांच्या जिवाशी खेळणे आहे. त्यामुळे असे उघड्यावरचे कार्यक्रम, तेही भर दुपारचे टाळायला हवे होते.”
हेही वाचा >> Maharashtra Bhushan : अखेर ओळख पटली, मृत्यू झालेले 13 श्री सदस्य कोण?
“आता असे समजले की, प्रमुख पाहुणे शाह यांना संध्याकाळी येण्यास वेळ नव्हता. म्हणून दुपारीच उत्सव केला. प्रमुख पाहुण्यांची ‘सोय’ म्हणून सोहळा भर दुपारी केला खरा, परंतु पाहुण्यांसाठी विशेष थंड मंडप घातला गेला व श्री सेवक मात्र उन्हात शरीर भाजत बसले. आता या आगीत जे मरण पावले, त्यांचा दोष काय? मग सरकारच्या कर्त्याधर्त्यांवर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला नको काय?”, असा सवाल करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीचं कौतुक, अजित पवार-अंबादास दानवेंबद्दल काय म्हटलंय?
“मंचावर जे सरकार म्हणून उपस्थित होते ते सगळेच या दुर्घटनेचे अपराधी आहेत. आज देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असते तर ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यकर्त्यांसह घुसून ठाण मांडून बसले असते आणि मुख्यमंत्री व आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेऊनच उठले असते. विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांनी हाच पवित्रा घेणे गरजेचे आहे”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
“मुळात देवेंद्र फडणवीस यांनी फक्त शोक संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी मृतांची किंमत लावून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली, पण खारघर येथे झालेला 13 श्री सेवकांचा मृत्यू सरकारी बेफिकिरी व राजकीय लोभामुळे झाला. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे? अप्पासाहेबांना दिलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’मुळे जो आनंद झाला, त्यास गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्री व त्यांच्या अति फाजील टोळीने केले. सरकारी पैशांचा, यंत्रणेचा वापर करून 13 श्री सेवकांचा बळी घेणे हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात बसते”, असं शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.
ADVERTISEMENT