CM Eknath Shinde Viral Video: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होतोय. पत्रकार परिषदेच्या आधी तीनही नेते येत असताना ‘आपण बोलून मोकळं व्हायचं’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांना म्हणताना या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री होकार देतात, इतक्यात माईक सुरु असल्याची आठवण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंना करुन देतात. (cm eknath shinde viral video on maratha morcha know what exactly is the issue devendra fadnavis ajit pawar)
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
मागील 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यामुळे आता याबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. ज्यामुळे याविषयाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीने सरकारने पावलं उचलली आहे. अशातच मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शिंदे जे काही बोलले ते रेकॉर्ड झालं. ज्याच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती दिली होती.
हे ही वाचा >> Yashomati Thakur : ‘तू चोट्टा, तुझी बायको चोट्टी’ त्या आरोपावर यशोमती ठाकुर राणांवर भडकल्या
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. ‘सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे “नाकर्ते सरकार” राज्याचा कारभार हाकत आहे.’ असं कॅप्शन वडेट्टीवार यांनी या व्हिडीओसोबत लिहीलं होतं.
दुसरीकडे हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बरीच टीका देखील झाली. आता याच टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी देखील उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा तर खोडसाळपणा…’
‘मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.’
हे ही वाचा >> Maratha Morcha : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शिंदे-पवारांचा मोठा निर्णय
‘मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
ADVERTISEMENT