पुणे: पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने दाखवलेल्या असंवेदनशीलतमुळे एका महिलेला तिचा हकनाक जीव गमवावा लागला. ज्यावरून रुग्णालय प्रशासनावर चोहो बाजूने टीका होत आहे. 10 लाख रुपये डिपॉझिट जमा न केल्याने रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही. ज्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तनिषा भिसेंचा मृत्यू झाला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणी आज (7 मार्च) रुग्णालयाचे डीन आणि इतर प्रशासकीय मंडळाने पत्रकार परिषद घेऊन त्यांचं म्हणणं मांडलं.
ADVERTISEMENT
यावेळी रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 'आमच्या रुग्णालयातील कोणताही डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिटची मागणी करत नाही. पण त्या दिवशी डॉक्टर घैसास यांच्या डोक्यात काय राहू-केतू आला आणि त्यांनी फॉर्मवर 10 लाख रुपये असं लिहून दिलं.'
हे ही वाचा>> Mangeshkar Hospital: कोण होत्या तनिषा भिसे? पहिलंच बाळंतपण, दोन चिमुकलींना जन्म दिला अन्...
यावेळी धनंजय केळकर यांनी देखील मान्य केलं की, डॉ. सुश्रृत घैसास यांनी 10 लाख रुपये डिपॉझिट असं फॉर्मवर लिहून दिलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी डॉ. घैसास यांनी रुग्णालयातील त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे ते दीनानाथ रुग्णालयासोबत नसतील.
पाहा नेमकं काय म्हणाले दीनानाथ रुग्णालयाचे डीन
प्रश्न: जी भिसेंची केस आहे ज्यामध्ये 10 लाख रुपये मागण्यात आले होते. अशा किती केसेस आहेत की, त्यात पैसे मागितले जातात?
धनंजय केळकर (डीन): आमच्याकडे डॉक्टरांकडून डिपॉझिट मागण्याची पद्धत नाहीए. हा आमचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये खर्चाचे अंदाज पत्रक असं लिहिलं आहे. हा छापील पेपर आहे. प्रत्येक रुग्णाला हा पेपर दिला जातो. फक्त भिसेंना नाही तर प्रत्येकाला दिला जातो.
डॉक्टर त्यावर लिहितात की पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीए. परंतु काही कारणाने त्यादिवशी.. राहू-केतू काय डोक्यात आला आणि डॉक्टर घैसासांनी एक चौकोन करून त्यात 10 लाख रुपये डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे.. असं कोणीही लिहित नाही. यांच्यापैकी इथे कोणालाही विचारू शकतात. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील.. अगणित केल्या असतील. पण आजवर एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही.
यामुळे डिपॉझिट जर कोणाला घ्यायचं असेल तर बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून आणि समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं काही फक्त निवडक केसेसमध्ये ठरवतं.
हे ही वाचा>> Pune: दीनानाथ रुग्णालयात 'त्या' दिवशी नेमकं घडलं तरी काय?, तनिषा भिसेंची संपूर्ण कहाणी जशीच्या तशी...
ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी पेशंटला काही तरी सांगितलं. अशी माहिती धनंजय केळकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
डीन धनंजय केळकर पत्रकार परिषद अर्धवट सोडून गेले?
दरम्यान, याच पत्रकार परिषद जेव्हा पत्रकारांनी डॉ. धनंजय केळकर यांना काही अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तेव्हा मात्र, धनंजय केळकर यांनी काहीही उत्तरं देण्यास नकार दिला आणि पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेले.
ADVERTISEMENT
