महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा अजित पवारांभोवती फिरू लागलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी 2019 मध्ये भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. याच इतिहासाची पुनरावृत्ती महाराष्ट्राला बघायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याची अजित पवारांची इच्छा असून, त्यांना पक्षातील 30 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचंही सागितलं जात आहे. पण, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुर्णपणे वेगळी भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याच्या संबंधीचं काम कुणीतरी करतंय, यापेक्षा त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पुरतं सांगू इच्छितो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सर्व सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तिशाली कसं करायचं, या भूमिकेत आहेत. त्याच्यापासून दुसरा कोणताही विचार कुणाच्या मनात नाही”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक?
“माझी काही बैठक नाही. यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. देहूचा कार्यक्रम करून रात्री मुक्कामाला मी मुंबईला जाणार आहे. मी वर्तमानपत्रात वाचलं की, आमदारांची काहीतरी बैठक आहे, पण माझी शंभर टक्के खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक नाही. कुणीही बोलावलेली नाही”, असं सांगत शरद पवारांनी आमदार बैठकीबद्दलचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
हेही वाचा >> राष्ट्रवादीत होणार भूकंप! अजित पवारांसह 34 आमदार भाजपसोबत जाणार?
शरद पवार रात्री मुंबईला येणार
“पक्षाचे प्रदेश अध्यक्ष (जयंत पाटील) हे त्यांच्या भागात निवडणुकीच्या प्रचारात आहेत. दुसरे पक्षाचे नेते आहेत अजित पवार, हे याच कामात आहेत. बाकीच्यांना मार्गदर्शन करत आहेत. या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी दुसरी कुणावर नाही. त्यामुळे हे लोक त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतोय. मी काय म्हणतोय ते अधिक महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगतोय की, मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्ही त्यासंबंधी पाठिमागे पडण्याचा अधिकार नाही”, अशी भूमिका शरद पवार यांनी या सगळ्या राजकीय चर्चांवर मांडली.
यापूर्वी पवारांनी काय म्हटलेलं होतं?
अजित पवार भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू झालेल्या चर्चेचा मुद्दा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवारांकडे मांडला होता. “कुणालाही मनापासून सोडून जायचं नाही पण, कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचं असतील तर तो त्यांचा प्रश्न पण, पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही”, असं शरद पवार यांनी बैठकीतील चर्चेवेळी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT