छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.
ADVERTISEMENT
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केलेला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात. शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
ADVERTISEMENT