PM Narendra Modi Vs Sharad Pawar : पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पहिला हल्ला चढवला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी थेट काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांसह शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘वार’ केला.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सध्या एक नवीन शब्द खूप लोकप्रिय केला जात आहे, तो म्हणजे ग्यारंटी (हमी). भाजपच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे की, त्यांनी लोकांना सांगावं की विरोधक कोणत्या गोष्टीची ग्यारंटी आहे. हे सगळे लोक, हे पक्ष हमी (ग्यारंटी) आहे भ्रष्टाचाराची. हे हमी आहे की, लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्यांची.”
“काही दिवसांपूर्वी यांचा भेटून फोटो काढण्याचा एक कार्यक्रम झाला. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षाच्या इतिहास बघितला तर कळेल की, त्या सगळे मिळून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची ग्यारंटी आहेत. काँग्रेसचा घोटाळाच लाखो, करोडोंचा आहे”, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
“एक लाख 86 हजारांचा कोळसा घोटाळा, 1 लाख 74 कोटींचा टू जी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा आहे. 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, हेलिकॉप्टरपासून युद्धनौकापर्यंत एकही क्षेत्र नाही, जिथे काँग्रेसने घोटाळा केलेला नाही”, असं टीकास्त्र मोदींनी काँग्रेसवर डागलं.
मोदींनी वाचली राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची यादी
“राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगायचं, तर एनसीपी’ वरही जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा.. यांची यादीही खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होतच नाही”, असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला घेरलं.
“मी तर सांगेन की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी यांच्या घोटाळ्याचे मीटर बनवा. यांच्याकडे घोटाळ्यांचाच अनुभव आहे. यांची कुठली हमी आहे, तर ती आहे घोटाळ्यांची हमी. आता देशाला ठरवायचं आहे की, घोटाळ्यांची हमी देणाऱ्यांना स्वीकारणार का?”, असा सवाल मोदींनी केला.
हेही वाचा >> PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!
विरोधकांना मोदींचा इशारा
“त्यांची जर घोटाळ्यांची हमी आहे, तर मोदींचीही एक हमी आहे, ती म्हणजे प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची हमी. प्रत्येक चोर लुटारूंवर कारवाईची हमी. ज्यांनी देशाला लुटले, त्यांचा हिशोब तर होणारच. आज जेव्हा कायद्याचा दंडा चालतोय, जेव्हा तुरुंग समोर दिसू लागला आहे. ते बघून ही जुगलबंदी होत आहे. यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम भ्रष्टाचाराविरुद्ध असलेल्या कारवाईतून वाचण्याचाच आहे”, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.
“जेव्हा गावात कुणी आरोपी तुरुंगातून येतो, तेव्हा त्याच्याबद्दल काय दृष्टिकोण असतो? तुरुंग कसा असतो, हे जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असते. त्यासाठी पाटण्यापेक्षा चांगली जागा कुठली असू शकते? आज पण बघतोय, जे जामिनावर बाहेर आहेत. जे घोटाळ्यातील आरोपी आहेत, ते लोक तुरुंगातून आलेल्या लोकांना भेटत आहेत. ते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे लालू प्रसाद यादव यांना टोला लगावला.
हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
“तुम्हाला कुणाला कल्याण होताना बघायचं आहे. तुम्हाला गांधी कुटुंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल, तर काँग्रेसला मत द्या. तुम्हाला मुलायमसिंह यांच्या मुलाचं भलं करायचं, तर समाजवादी पक्षाला मत द्या. जर तुम्हाला लालूंच्या कुटुंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल, तर आरजेडीला मत द्या. तुम्हाला शरद पवारांच्या मुलींचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. तुम्हाला के. चंद्रशेखर राव यांच्या मुलींचं भलं करायचं असेल, तर बीआरएसला मत द्या, पण जर तुम्हाला तुमच्या मुलाचा, मुलीचा, नातंवडांचं कल्याण करायचं असेल, तर भाजपला मत द्या”, असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT