Raj Thackeray Pune : (ओमकार वाबळे, पुणे) शरद पवारांनी केलेल्या एका विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून शरद पवारांना टोला लगावला. (Raj Thackeray's first reaction to Sharad Pawar's statement)
ADVERTISEMENT
पावसामुळे पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी घरांमध्ये गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले.
मराठा विरुद्ध ओबीसी वाद वाढला
राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शरद पवारांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं. विशेष करून मराठवाड्यात जो मराठा विरुद्ध ओबीसी जातीयवाद वाढलाय... त्यांचे हे भाष्य आणि तुम्ही शरद पवारांच्या एकूण राजकारणावर जे भाष्य केले आहे. आता विधानाकडे कसे बघता?
राज ठाकरेंनी काय दिले उत्तर?
"शरद पवारांचं विधान मी वाचलेलं नाही. पण, शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये. बाकी काही नाही" असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.
शरद पवारांचं महाराष्ट्र-मणिपूरबद्दल विधान काय?
"मघाशी कुणाच्यातरी बोलण्यामध्ये मणिपूरचा उल्लेख झाला. देशाच्या पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली. मणिपूरचे विविध जातीचे, धर्माचे, भाषेचे लोक आम्हाला भेटायला दिल्लीला आले. आणि चित्र काय सांगितलं? तर पिढ्यानपिढ्या एकत्र असणारा हा प्रांत अस्वस्थ झाला. दोन जमातीमध्ये संघर्ष झाला. घरंदारं पेटवण्यात आली, शेती उध्वस्त झाली. स्त्रियांवर अत्याचार झाले."
हेही वाचा >> "...तर आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकलं असतं"
"पिढ्यानपिढ्या एकत्र असणारा, सुसंवाद ठेवणारा मणिपुरी आज एकमेकांशी बोलायला तयार नाही ही अवस्था त्याठिकाणी आहे. आज एवढंमोठं संकट एका राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की त्याला सामोरं जाणं, लोकांना विश्वास देणं, एकवाक्यता निर्माण करणं, कायदा आणि सुव्यवस्था जतन करणं."
हेही वाचा >> फडणवीस-देशमुख वादातील समित कदम कोण?
"पण, दुर्दैवानं आजच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. आज एवढं झाल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपण तिकडं चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही. हे घडलं मणिपूरमध्ये. आजूबाजूच्या राज्यातही घडलं. खाली कर्नाटकामध्येही घडलं. आणि अलिकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले", असे भाष्य शरद पवारांनी केले होते.
ADVERTISEMENT