महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, आज हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, राज ठाकरेंनी याबद्दलची भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अक्षयतृतीयेच्या दिनी राज्यभर महाआरती करण्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली होती. रविवारी औरंगाबादेत सभा झाल्यानंतर आता मनसेकडून महाआरतीची तयारी सुरू होती. मात्र, आज महाआरती रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
याबद्दल राज ठाकरे यांनी एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. ज्यात सुरुवातीलाच महाराष्ट्र सैनिकांसाठी असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.
“उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका.”
“आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच!,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना तीन कार्यक्रम जाहीर केले होते. मुंबई आणि ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरे पुण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी तीन कार्यक्रम जाहीर केले होते. यात औरंगाबाद येथील सभा, अयोध्या दौरा आणि अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करणार, असं ते म्हणाले होते.
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे भोंग्यांबद्दल काय म्हणाले?
राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत म्हणाले, “हे जर या पद्धतीने वागणार असतील. यांना जर सरळ सांगून समजत नसेल, तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ना, ती यांना एकदा दाखवावीच लागेल. म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की, यांची एकदा थोबाडं बंद करा. माझी संपूर्ण देशवासियांना विनंती आहे की, बिल्कुल मागचा पुढचा विचार करु नका. हे भोंगे उतरलेच पाहिजे.”
“सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोगे… उद्या मंदिरांवरचे असले तरीही उतरले गेले पाहिजे. पण यांचे उतरले गेल्यानंतर.. अभी नही तो कभी नही.. माझी हिंदू बांधवांना विनंती आहे की, जर हे ३ तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर हनुमान चालीस ऐकू आली पाहिजेच. पोलिसांकडून रितसर परवानगी घ्या. ती घ्यावीच लागेल. हा विषय कायमचा निकाली लागेल ही अपेक्षा करतो,” असं ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT