देशातील वाढत्या असहिष्णू वातावरण बोट ठेवत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर हल्ला चढवला. दुसरीकडे राज्यात काढण्यात येत असलेल्या सावरकर गौरव यात्रेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला सवाल केला आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काही मुद्दे उपस्थित केले असून, देशात दंगली घडवल्या जातील, असा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत लेखात म्हणतात, “हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला. कारण विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धा, भोंदुगिरी, जादुटोणा यामागे जनता लागली. भाजपने ’सावरकर गौरव यात्रा’ काढली. सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल.”
“हिंदुस्थान गुलाम का झाला? यावर आतापर्यंत अनेक चर्चा घडल्या असतील, पण हिंदुस्थानने गुलामी का पत्करली याचे उत्तर देशातील आजच्या भाजप राजवटीत आहे. विज्ञानाची, आधुनिकतेची कास सोडून देशाला भोंदू बाबागिरीच्या मार्गाने नेणे हाच गुलामीचा मार्ग आहे. देशी लोकांत कमालीची वाढलेली अंधश्रद्धा, धर्मांधता, बुवागिरी यामुळे जनतेला गुलाम करून देश ताब्यात घेणे इंग्रजांना शक्य झाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष देश ताब्यात ठेवण्यासाठी तोच ब्रिटिश मार्ग अंगीकारत आहे. लोकांना बुवा, महाराज, अंगारे-धुपारे, मंदिर, मशीद, कथा वाचक, धर्म मेळे यांत गुंग ठेवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करायचे व त्याच ‘धुंद’ वातावरणात निवडणुका जिंकायच्या. जाती व धर्मात भांडणे लावण्याचे काम इंग्रजांनी केले. लोकांना भांडत ठेवले व इंग्रज देश लुटत राहिले. आता वेगळे काय सुरू आहे?”, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊतांनी ‘रोखठोक’मध्ये मांडलेले काही मुद्दे
-“आसामच्या भाजप आमदार रूपज्योती कुर्मी यांनी आता एक मागणी लावून धरली. ‘ताजमहाल आणि कुतुबमिनार तोडा व तेथे मंदिर बनवा. मी त्याकामी एक वर्षाचा पगार देते!’ आता ताजमहाल, कुतुबमिनार तोडण्यासाठी एखादी चळवळ उभी करून वातावरण तापवले जाईल. मूर्ख आणि बिनडोक लोक त्या चळवळीत सामील होतील, त्यावरून दंगली घडवल्या जातील. राजकारणी मजा पाहतील.”
-“वीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक होते. ते हिंदुत्ववादी होते, पण हिंदुत्वाच्या नावाखालची बुवाबाजी त्यांना मान्य नव्हती. त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता. त्यांना शस्त्रांचे सामर्थ्य मान्य होते. चीनपुढे नमते घेणारे लोक आज महाराष्ट्रात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढतात हे अजब आहे. सावरकर गौरव यात्रा काढणे ही एकप्रकारे भोंदुगिरीच आहे.”
हेही वाचा >> ‘साधू हत्याकांड आमच्या राज्यात होणार नाही’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
-“नरहर कुरुंदकर सावरकरांविषयी म्हणतात, ”सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते. एकाही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता. माणूस म्हातारपणी धार्मिक होतो असे म्हणतात, पण सावरकरांच्या बाबतीत हे घडले नाही. जेव्हा स्वयंचलित साधने नव्हती, तेव्हा प्रेते खांद्यावरून वाहावी लागत आणि लाकडे रचून जाळावी लागत. आज मोटारी आहेत, विजेची दहनभूमी आहे. मग जुन्या कालबाह्य परंपरा कशाला, असे त्यांना वाटे. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे विजेच्या पेटीत त्यांचे दहन करण्यात आले. हे सावरकर गौरव यात्रावाल्यांना मान्य आहे काय?”
-“आज देशातील शिकलेसवरलेले लोकही अंधश्रद्धाळू आणि बुवाबाज बनले. हे भाजपच्या ‘भारतीय’ राजकारणाचा अजेंडा आहे. नवे बाबा, कथा वाचक वगैरे उभे करून त्यांच्या नावाने गर्दी जमवायची व आपला अजेंडा पुढे न्यायचा. सावरकरांचा जपजाप करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रेडा बळी, मिरची यज्ञ व इतर विधी सत्ता मिळविण्यासाठी व विरोधकांना गारद करण्यासाठी करतात. त्यामुळे लोकांनी काय बोध घ्यायचा?”
-“आसाराम बापूंचा भाजपने पुरेपूर वापर करून घेतला. त्यांच्या सत्संगात मोदींपासून सगळ्यांनी वारंवार हजेरी लावली. नाचले व गायले. रामदेव बाबालाही प्रचारात आणले. साधू परिषदांना हवा दिली. आता कुणी एक बागेश्वर बाबांना उभे करून त्यांच्या माध्यमांतून गर्दी गोळा केली जात आहे.”
भाजपकडून इंग्रजांचेच डावपेच -संजय राऊत
-“कोट्यवधींची उलाढाल या माध्यमांतून सुरू आहे व हे महाराज आज छुपे प्रचारक असले तरी उद्याचे भाजपचे मुख्य प्रचारक ठरू शकतात. अशा बुवा-महाराजांच्या खांबावर आजचा भाजप उभा आहे व त्यामुळे देशाचा प्रवास विज्ञानातून पुन्हा भूतप्रेत, जादूटोणा व अंधश्रद्धेकडे सुरू झाला आहे. ‘कथा वाचक’ मंडळींना हाताशी धरून लोकांना विज्ञान व आधुनिकतेपासून दूर न्यायचे असे हे डावपेच. इंग्रजांनी त्यांच्या काळात तेच केले.”
-“भाजपने महिना लाख रुपये मानधनावर पाचशे कथा वाचक नेमले आहेत, असे त्यांचेच लोक सांगतात तेव्हा माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटत नाही. कारण गुलामीचे सावट मी त्या योजनेत पाहतो. जया किशोरी या कथा वाचिकेचा सध्या बराच बोलबाला आहे. त्या सांगतात, ‘मोहमाया सोडून ईश्वराशी नाते जोडा. आपण रिकाम्या हाताने आलो व रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग मोहमाया कशाला?’ पण जया किशोरी कथा सांगण्यासाठी 10 लाख रुपये फी आकारतात. या मोहमायेस काय म्हणावे?”
हेही वाचा >> अजित पवारांचा PM मोदींसह मुख्यमंत्री शिंदेना टोला, अन् कार्यक्रमात एकच हशा पिकला
– “संसदेतून आधुनिक आणि विज्ञान हद्दपार झाले असून तेथे अनेक बाकांवर आता जटाधारी, दाढीवाले बुवा-महाराज हे भगव्या वस्त्रांत बसलेले दिसतात. त्यातले काही महाराज लोक उघड्या अंगाने बसतात. हे पाहायला विचित्र वाटते. संसदेची प्रतिष्ठा त्यात कमी होते. नेहरूंचा विज्ञानवाद, वीर सावरकर व डॉ. आंबेडकरांच्या आधुनिक विचारांचा हा पराभव आपल्याच संसदेत झालेला दिसतो. विरोधी बाकांवरून ‘अदानीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा’ अशी मागणी होताच सत्ताधारी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात. जणू काही श्रीरामानेच भ्रष्टाचार व देश बुडवण्याचा मंत्र दिला. हा धर्माचा पराभव आहे, सत्याचा पराभव आहे आणि स्वातंत्र्याचा सगळय़ात मोठा पराभव आहे.”
ADVERTISEMENT