Uniform Civil Code : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, ‘एकीकडे असे लोक आहेत. जे तुष्टीकरण करून आपल्या स्वार्थासाठी इतरांना एकमेकांच्या विरोधात उभे करतात आणि दुसरीकडे आम्ही भाजपचे लोक आहोत. आपण तुष्टीकरणाचा मार्ग पत्करायचा नाही, असे भाजपने ठरवले आहे. देशाचे भले करण्याचा मार्ग हा तुष्टीकरणाचा नसून समाधानाचा आहे.’
ADVERTISEMENT
व्होट बँकेचे भुकेले मुस्लिम भगिनींचं नुकसान करताहेत
यावेळी पीएम मोदींनी बूथ कार्यकर्त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. लखनौमधील बडा चंदगंज येथील रहिवासी असलेल्या रीना चौरसिया यांनी मोदींना विचारले की, पूर्वी लोक तिहेरी तलाकला विरोध करत होते, आता समान नागरी संहितेला (यूसीसी) विरोध करत आहेत, हा मुस्लिमांमधील संभ्रम कसा दूर करायचा?
हेही वाचा >> NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’
यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले की, “जो कोणी तिहेरी तलाकच्या बाजूने बोलतो, ते वोट बँकचे भुकेले असलेले लोक मुस्लिम भगिनींचे खूप नुकसान करत आहेत. तिहेरी तलाकचे नुकसान केवळ मुलींचेच नाही, तर त्याची व्याप्ती यापेक्षा खूप मोठी आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, जर एखाद्या मुलीला तीन वेळा तलाक बोलून घराबाहेर काढले तर तिच्या वडिलांचे काय होईल, तिच्या भावाचे काय होईल, यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.”
मग मुस्लिम देश तिहेरी तलाकवर बंदी का घालतात?
तिहेरी तलाक इस्लामशी संबंधित असता तर कोणत्याही मुस्लिम देशाने त्यावर बंदी घातली नसती. इजिप्तने 90 वर्षांपूर्वी ते रद्द केले होते. जर ते इस्लामशी संबंधित असेल तर इस्लामिक देश ते का संपवतील. कतार, जॉर्डन, इंडोनेशियासारख्या देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी का घातली गेली. तिहेरी तलाकच्या आडून काही लोकांना मुस्लीम भगिनींवर अत्याचार करायला रस्ता मोकळा हवा आहे, असंही मोदी म्हणाले.
UCC च्या नावाने मुस्लिमांना भडकावणारे पक्ष
‘भारतातील मुस्लिमांना कोणते राजकीय पक्ष भडकवत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आजकाल ते UCC च्या नावाने चिथावणी देत आहेत. घरात एका सदस्यासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल तर घर चालेल का? मग अशा दुहेरी व्यवस्थेने देश कसा चालवणार? हे लोक आमच्यावर आरोप करतात. जर ते मुस्लिमांचे खरे हितचिंतक असते, तर मुस्लिमही मागे राहिले नसते. समान नागरी कायदा आणा असे सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत आहे, पण या व्होटबँकेच्या भुकेल्या लोकांना तसे करायचे नाही’, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर हल्ला केला.
हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
पसमांदा मुस्लिमांमध्ये भेदभाव केला गेला
पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘पसमंदा मुस्लिम बांधवांचा व्यथा ऐकणारे कुणी नाही. त्यांच्या धर्मातील लोकांनी काही चांगले केले असते तर हे घडले नसते. आजही त्यांना व्हिसा मिळत नाही. ते मागासलेले राहिले नसते. पसमांदा मुस्लिमांसोबतच्या भेदभावाचे नुकसान अनेक पिढ्यांना सहन करावे लागले, मात्र भाजप सरकार सबका साथ, सबका विकास उद्दिष्ट ठेवून विकासासाठी काम करत आहे. जे पक्ष यूसीसीला विरोध करत आहेत ते मुस्लिमांचे हितचिंतक नाहीत. पसमांदा मुस्लिम या पक्षांमुळे मागासलेले राहिले आहेत’, असंही मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT