Rahul Gandhi: नवी दिल्ली: एकीकडे राजधानी दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत तब्बल २ तास चर्चा केली. या बैठकीत राहुल गांधींनी काही अत्यंत महत्त्वाची विधानं यावेळी केली. यावेळी शिवसेना (UBT) पक्षासोबत असलेल्या युतीविषयी देखील राहुल गांधींनी महत्त्वाचं वक्तव्य करत महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांचे कानही टोचले.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय-काय घडलं? वाचा बैठकीतील Exclusive माहिती
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत आज जी बैठक झाली ती तब्बल २ तास सुरु होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी असा सूर लावला की,जी लोकं काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांना आता पुन्हा पक्षात घेऊ नका.
याच बैठकीत राहुल गांधी असं म्हणाले की, बेशिस्तपणा पक्षात खपवून घेतला जाणार नाही. यावेळी राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांचे उदाहरण दिले.आता ते भाजपमध्ये असूनही कुठेच नाहीत,नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला आणि अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये मान नाही. असंही ते यावेळी म्हणाले.त्यामुळे काही बाबतीत सीमारेषा आखल्या गेल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा>> MVA : मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा?
याशिवाय महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी संजय निरुपम यांचे उदाहरण दिले.त्यांनी जाहीर वक्तव्ये करण्यास सुरुवात केल्यावर त्यांना काढून टाकण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, यावेळी राहुल गांधी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. 'शिवसेना आणि आपण एकत्र राहायला हवं,पण आपल्याला आपला समजुतदारपणा कायम ठेवावा लागेल. तसेच युतीचे नुकसान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी (महाराष्ट्रात युतीचं नुकसान होईल विधाने करू नये).' अशा स्पष्ट शब्दात राहुल गांधींनी नेत्यांना समज दिली आहे.
याशिवाय राहुल गांधी असंही म्हणाले की, 'ग्राऊंड लेव्हलला काम करणाऱ्या नेत्यांना आम्ही प्राधान्य देऊ,त्यांचे मत हे महत्त्वाचे ठरेल.'
दरम्यान, मुंबईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे.याबाबत रमेश चेन्निथला यांनी एकत्र बसून प्रकरण मिटविण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा>> मविआला रोखण्यासाठी महायुतीची स्ट्रॅटजी! विधानसभेसाठी अशी मत'पेरणी'?
याशिवाय काही काँग्रेस नेत्यांनी आपल्या पक्षाचे लोक लोकसभेत काम करत नसल्याच्या तक्रारीही केल्या.तसेच त्यांनी शिस्त पाळली पाहिजे असंही यावेळी सांगण्यात आलं.
यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे आघाडीला नुकसान होईल असं भाष्य न करण्याची तंबीच राहुल गांधींनी आपल्या नेत्यांना दिली आहे.
ADVERTISEMENT