Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि इतर 8 मंत्री, नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मंत्री आणि नेते मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरला पोहोचले. तासभर झालेल्या बैठकीनंतर प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना भेटीच्या कारणाबद्दल भाष्य केले.
ADVERTISEMENT
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (16 जुलै) सुरू होत आहे. यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची आणि नेत्यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांसह सर्व मंत्री आणि त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे नेते दुपारी 1 वाजता वाय.बी. चव्हाण सेंटरला पोहोचले.
शरद पवारांची भेट का घेतली?
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार व त्यांच्या समर्थक नेत्यांची तासभर बैठक चालली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, “आमचे सर्वांचे दैवत, सर्वांचे नेते शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील आणि बाकीचे मंत्री आज यशवंतराव चव्हाण सेंटरला वेळ न मागता आलो होतो.”
“शरद पवार हे इथे बैठकीसाठी आल्याचे आम्हाला कळले होते. त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. आम्ही शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर आम्ही त्यांना विनंती केली की, आमच्या सगळ्यांचा मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमची मतं आणि विनंती ऐकून घेतलं. भेटीनंतर आम्ही परत जात आहोत. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. सर्व मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपापली जबाबदारी पार पाडतील”, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट रोखण्याचा प्रयत्न
अजित पवार यांनी बंड केल्यापासून शरद पवार यांनी त्यांच्याबद्दल टीका केलेली नाही. त्याचबरोबर आपण भाजपसोबत जाणार नाही, पुन्हा नव्याने पक्षबांधणी करणार असं पवारांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे अजित पवार गटाला सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे पक्षाची दोन शकले झाली. पण, अजूनही ही फूट टाळण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जाताना दिसत आहे.
प्रफुल पटेल यांनीच तसं भाष्य केलं आहे. प्रफुल पटेलांनी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, असं म्हटलं असलं तरी या भेटीचा मुख्य उद्देश पक्ष फूट रोखण्याचाच होता. शरद पवार यांना अजित पवार गटाने तसं साकडंच घातलं आहे. शरद पवारांनी यावर काहीही उत्तर दिले नाही. मात्र, या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.
ADVERTISEMENT