श्रीलंकेविरुद्ध करो किंवा मरोच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने दिलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने शेवटच्या षटकात पूर्ण केले आहे. यामुळे टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता मावळली आहे. भारत आशिया कपमधून जवळपास बाहेर पडला आहे.
ADVERTISEMENT
श्रीलंकेला शेवटी 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. श्रीलंकेच्या फलंदाजांना अर्शदीप सिंगच्या चेंडूवर मारा करता आला नाही, चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला आणि तिथून गोलंदाजाकडे आला. परंतु भारतीय खेळाडूंना धावा वाचवता आल्या नाहीत आणि सामन्यात हार मानवी लागली. श्रीलंकेला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती, अर्शदीप सिंगने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
अर्शदीप सिंगचे शेवटचे षटक: (श्रीलंकेला विजयासाठी 7 धावांची गरज)
19.1 ov: 1 धाव
19.2 ov: 1 धाव
19.3 ov: 2 धावा
19.4 ov: 1 धाव
19.5 ov: 2 धावा
आता टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते का?
आशिया चषक 2022 मध्ये भारताने सलग दुसरा सामना गमावला आहे, आधी पाकिस्तान आणि आता श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण झाले आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे इतर संघांवर अवलंबून आहे, विशेषत: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर.
7 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना आहे, जर पाकिस्तानने येथे विजय मिळवला तर भारत स्पर्धेतून बाहेर पडेल आणि त्यानंतरचा शेवटचा सामना ही केवळ औपचारिकता राहील. अशा स्थितीत भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याची केवळ एवढीच संधी आहे.
अफगाणिस्तान ठरवणार भारताचे भविष्य
अफगाणिस्तानने त्यांच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. तसेच भारताने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. नंतरच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानलाही हरवले तर भारत अंतीम सामन्यात जाऊ शकतो. भारताचा नेट रन रेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. परंतु असे होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
श्रीलंकेच्या सलामीवीरांनी भारताची दाणादाण उडवली
या सामन्यात श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी भारताच्या गोलंदाजांना चोप दिला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी अवघ्या 12व्या षटकात 97 धावांची भागीदारी केली. पथुम निसांकाने 37 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 37 चेंडूत 57 धावा केल्या.
श्रीलंकेचे सलामीवीर बाद होताच टीम इंडियानेही सामन्यात पुनरागमन केले. रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहलच्या स्पेलने श्रीलंकेला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. युझवेंद्र चहलने आपल्या 4 षटकात 34 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले, दोन्ही सलामीवीरांशिवाय त्याने चरित असलंकालाही बाद केले.
त्याचवेळी या सामन्यात संघात समाविष्ट असलेल्या रविचंद्रन अश्विनने चार षटकात 32 धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अश्विनने निर्णायक क्षणी दानुष्का गुनाथिलकाला (1 धाव) बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. मात्र, अखेरीस टीम इंडियाचा पराभव झाला.
रोहितशिवाय सर्व अपयशी
टीम इंडियाला या सामन्यात प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले आणि त्यांची सुरुवात पुन्हा खराब झाली. केएल राहुल अवघ्या 6 धावा करून बाद झाला, पण यावेळी संघाचा कर्णधार रोहित शर्माने कमाल केली. रोहितने 72 धावा केल्या आणि बऱ्याच कालावधीनंतर तो पूर्ण फॉर्म मध्ये दिसला. रोहित शर्माने आपल्या खेळीत 5 चौकार, 4 षटकार मारले.
मात्र कर्णधार रोहितशिवाय एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. माजी कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला, तर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत 17-17 धावांवर बाद झाले. 34 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवने रोहितला काही काळ साथ दिली. टीम इंडियासाठी रोहित शर्माने एक बाजू लावून धरली, पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना, भारताच्या धावांचा वेगही मंदावला. अशा स्थितीत भारताचा डाव 173 धावांवर संपुष्टात आला.
ADVERTISEMENT