पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेख (sikandar shaikh pahalwan) यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा होत असतानाच आता सिंकदर पुन्हा एकदा दंड थोपटणार आहे. मोहोळ तालुक्यातील टाकळी येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं (bhima kesari kusti spardha) आयोजन करण्यात आलं आहे. या कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडही (mahendra gaikwad wrestler) सहभागी होणार आहे. मात्र, सिंकदर शेख आणि महेंद्र गायकवाड हे एकमेकांशी नव्हे, तर वेगवेगळ्या पैलवानांशी भिडणार आहेत.
ADVERTISEMENT
खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कारखान्याच्या परिसरातच तयार करण्यात आलेल्या कुस्तीच्या फडात ही स्पर्धा होणार आहे.
भीमा केसरी कुस्ती स्पर्धेत मल्ल सिंकदर शेख आणि मल्ल महेंद्र गायकवाड हे दोघंही पंजाबमधील मल्लाशी कुस्ती करणार आहेत. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा कुस्तीचा आखाडा बनविण्यात आला असून, भव्य गॅलरी देखील उभारण्यात आली आहे.
राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नावे नोंदवली असली, तरी 5 कुस्त्या या महत्वाच्या असणार आहेत.
भीमा केसरी कुस्ती स्पर्धा : 9 लाखांची बक्षिसे, पाच लढतींकडे असणार कुस्तीप्रेमींचं लक्ष
भीमा केसरी स्पर्धेत 9 लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या जाणार असून, ‘भीमा केसरी’साठी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात लढत होणार आहे.
‘भीमा साखर केसरी’च्या गदेसाठी महान भारत केसरी माऊली जमदाडे आणि माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख हे दोन मल्ल झुंजणार आहेत. ‘भीमा कामगार केसरी’साठी मुंबई महापौर केसरी गणेश जगताप आणि पैलवान अक्षय शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
‘भीमा वाहतूक केसरी’साठी यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी ठरलेला महेंद्र गायकवाड आणि पंजाब येथील गोरा अजनाला यांच्यात लढत होणार आहे. ‘भीमा सभासद केसरी’साठी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट अक्षय मंगवडे आणि संतोष जगताप यांच्यात लढत होणार आहे.
भीमा केसरीसाठी असणार अनुभवी पंच
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने भीमा केसरीसाठी कोल्हापूर, पुणे आणि इतर ठिकाणाहून अनुभवी पंच येणार आहे. या कुस्त्यांच्या स्पर्धेसाठी कुस्ती क्षेत्रातील अनेक नामवंत मल्ल आणि राजकीय मंडळी हजेरी लावणार आहेत.
ADVERTISEMENT