रवी शास्त्रींचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या जागेवर राहुल द्रविडची नियुक्ती केली. NCA चा संचालक असलेल्या राहुल द्रविडला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यात कोणताही रस नव्हता परंतू सौरव गांगुली आणि जय शहा यांनी द्रविडला या जबाबदारीसाठी राजी केलं.
ADVERTISEMENT
राहुल द्रविडला या पदावर नियुक्त करण्यासंदर्भात नुकताच दुबईमध्ये पार पडलेल्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक समारंभामध्ये बीसीसीआय अध्यक्ष असणाऱ्या गांगुलीने एक मजेदार वक्तव्य केलं आहे.
“मला राहुल द्रविडच्या मुलाचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं की त्याचे वडील म्हणजेच राहुल द्रविडने त्यांना फार कठोर नियम घालून दिले आहेत. बाबा आमच्यासोबत अगदी कठोरपणे वागतो. त्यामुळेच आपल्या वडिलांना घरापासून दूर ठेवण्याची गरज आहे. त्यानंतरच मी राहुल द्रविडला फोन केला आणि सांगितलं की आता राष्ट्रीय संघासोबत काम करण्याची तुझी वेळ आली आहे,” असं गांगुलीने द्रविडच्या नियुक्तीचा किस्सा सांगताना मस्करीमध्ये म्हटलं.
तसेच सौरव गांगुली यांनी खुलासा करत असेही म्हटले होते की, “आम्ही एकत्र मोठे झाले आहोत, एकत्रच कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि जास्तीत जास्त वेळ एकत्र खेळण्यात घालवला होता. त्यामुळे मला त्याचे स्वागत करणे खूप सोपे वाटले होते.” राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची पहिली परीक्षा १७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.
आणखी एका मित्रावर गांगुली सोपवणार महत्वाची जबाबदारी, लक्ष्मणकडे NCA चं संचालकपद जाण्याची शक्यता
ADVERTISEMENT