इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stoke) एक धक्कादायक निर्णय घेत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती (Ben Stokes ODI retirement) घेतली आहे. स्टोक्स मंगळवारी (19 जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. 31 वर्षीय स्टोक्सने 104 एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या वनडे कारकिर्दीचा शेवट त्याच्या घरच्या मैदानावर होणार आहे.
ADVERTISEMENT
बेन स्टोक्सच्या एकदिवसीय कारकिर्दीचा संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्स येथे झालेल्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, जिथे त्याने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 84 धावा करून सामना सुपर ओव्हरमध्ये घेवून गेला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिले विश्वचषक जिंकले आणि नंतर बेन स्टोक्स सामनावीर ठरला.
ट्विटरवर ही बातमी शेअर करताना स्टोक्स म्हणाला, ‘मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे मला कमालीचे कठीण गेले आहे. इंग्लंड संघातील माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळाचा प्रत्येक मिनिट मला खूप आनंदात गेला. या काळात आम्ही एक अप्रतिम प्रवास केला.
पुढे तो म्हणाला, ‘मी कसोटी क्रिकेटला सर्वकाही देईन आणि आता या निर्णयामुळे मला वाटते की मी टी-20 फॉरमॅटमध्ये योगदान देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी जोस बटलर, मॅथ्यू मॉट यांना आणि सपोर्ट स्टाफला पुढील यशासाठी शुभेच्छा देतो. गेल्या सात वर्षांत आम्ही व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये बरीच प्रगती केली आहे आणि भविष्य खूप उज्ज्वल दिसत आहे.
बेन स्टोक्स म्हणाला, ‘इंग्लंडचे चाहते नेहमीच माझ्यासाठी आहेत आणि यापुढेही राहतील. आपण जगातील सर्वोत्तम समर्थक आहात. मला आशा आहे की आम्ही मंगळवारी सामना आणि मालिका दोन्हीही जिंकू.
बेन स्टोक्सची एकदिवसीय कारकीर्द
बेन स्टोक्सने आतापर्यंत 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.44 च्या सरासरीने 2919 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 102 आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 87 डावात 41.79 च्या सरासरीने 74 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.03 होता. बॉलसह त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 61 धावांत पाच विकेट्स.
टी-20 आणि कसोटी खेळत राहणार
बेन स्टोक्स टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला होता. यानंतर त्याच्या संघाने एजबॅस्टन कसोटीतही भारताविरुद्ध विजय मिळवला होता.
ADVERTISEMENT