साताऱ्यातील प्रियंका मोहिते या 30 वर्षीय गिर्यारोहक तरुणीने जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सिक्कीम येथील कांचनगंगा शिखर सर केले आहे. कांचनगंगा या खडतर पर्वत शिखरावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने केला आहे. हा विक्रम करणारी प्रियंका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.
ADVERTISEMENT
प्रियांकाने गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी कांचनगंगा शिखर सर करण्याची मोहीम फत्ते केली. तिच्या यशस्वी मोहिमेनंतर कुटुंबीयांनी साताऱ्यात आनंद व्यक्त केला आहे. प्रियंकाने आतापर्यंत केवळ कांचनगंगाच नाही तर अशाच खडतर मोहीमा पार पाडल्या आहेत. जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माऊंट एव्हरेस्ट, अन्नपूर्णा शिखर, किलिमंजारो, माउंट मकालू अशा पर्वतशिखरांवर प्रियंकाने चढाई केली आहे.
16 एप्रिल 2021 ला प्रियंकाने अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली होती. ही मोहीम पार करणारी पहिली भारतीय महिला म्हणून तिची ओळख आहे. अन्नपूर्णा हा पर्वत हिमालयाचा एक भाग असून तो नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 8 हजार फुटांपेक्षाही जास्त आहे. तिच्या या कामगिरीने तिचे कुटुंबीयही सुखावले आहेत. साताऱ्यात त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
प्रियंकाने 2013 मध्ये जगातील सर्वाधिक उंचीच्या समजल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट पर्वताची चढाई केली होती. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची 8, 848.86 मीटर म्हणजेच 29, 031.69 फूट इतकी आहे. नेपाळ व तिबेट या देशांच्या सीमेजवळ हे शिखर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. गिर्यारोहणाची आवड असलेल्या प्रियंकाचं तिच्या या कामगिरीसाठी सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
ADVERTISEMENT