लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड सुस्थितीत पोहचलेला आहे. भारताचा पहिला डाव ३६४ रन्सवर संपुष्टात आणल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेरीस ३ विकेट गमावत ११८ रन्सपर्यंत माजल मारली आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने अखेरच्या सत्रात भेदक मारा करत इंग्लंडला धक्का दिला.
ADVERTISEMENT
पहिल्या कसोटीच्या तुलनेत इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत चांगली सुरुवात केली. रोरी बर्न्स आणि डोम सिबले यांची जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असतानाच मोहम्मद सिराजने इंग्लंडला धक्का दिला. मैदानावर स्थिरावलेल्या डोम सिबलेला सिराजने लोकेश राहुलकरवी आऊट केलं, त्याने ११ रन्स केल्या. यानंतरच्या बॉलवर सिराजने हसीब हमीदला क्लिन बोल्ड केलं. सिराजला हॅटट्रीकची संधी होती, परंतू इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने सिराजचं ते स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.
जो रुटने सलामीवीर रोरी बर्न्सच्या साथीने इंग्लंडचा डाव सावरला. भारताच्या बॉलिंग लाईनअपचा चांगल्या पद्धतीने सामना करत इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी काही सुरेख फटके खेळले. तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही बॅट्समननी ८४ रन्सची पार्टनरशीप केली. अखेरच्या सत्रात इंग्लंडची ही जोडी भारताला जड ठरणार असं वाटत असताना मोहम्मद शमीने रोरी बर्न्सला आऊट करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. बर्न्सचं अर्धशतक एका धावेने हुकलं. यानंतर जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांनी अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत उरलेल्या ओव्हर्स खेळून काढल्या.
त्याआधी, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ रन्सपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ३ विकेट गमावत २७६ रन्सचा पल्ला गाठलेल्या भारताची दुसऱ्या दिवसातली सुरुवात अडखळती झाली. परंतू जाडेजा आणि पंतने एकाकी झुंज देत भारताला आव्हानात्मक धावसंख्येचा पल्ला गाठून दिला. याव्यतिरीक्त भारताच्या सर्व फलंदाजांनी निराशा केली.
ADVERTISEMENT