पुणे : दुसऱ्या T20 सामन्यात भारतावर १६ धावांनी विजय मिळवत श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी २१ धावांची गरज असताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानका याने फक्त ४ धावा देत संघाला सामना जिंकून दिला. निम्मा संघ माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी रचलेली ९१ धावांची भागिदारी भारताला विजयापर्यंत पोहचवू शकली नाही.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील स्टेडियमवर रंगलेल्या आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने या संधीचं सोनं करतं सामन्याची दमदार सुरुवात केली. श्रीलंकेच्या कुसल मेंडीस आणि निसंका या सलामी जोडीन ८.२ षटकात तब्बल ८० धावा चोपल्या. मात्र कुसल मेंडीसला बाद करत युझवेंद्र चहलने ही जोडी फोडली. त्यानंतर ठराविक अंतरात श्रीलंकेच्या विकेट पडत राहिल्या.
मात्र श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने २२ चेंडूत ५६ धावांच्या नाबाद खेळीने अखेरच्या पाच षटकात संघाला मोठा स्कोर उभा करुन दिला. त्याच्या या खेळीमुळे भारतासमोर २० षटकात विजयासाठी २०७ धावांचे आव्हान उभे राहिले.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या ५ षटकातच ४ बाद ३४ धावा अशी झाली होती. कुसल रजिताने इशान किशन (२), शुभमन गिल (२) यांना बाद करत दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. तर पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीला दिलशान मधुशनकाने ५ धावांवर बाद केलं. त्यापाठोपाठ कर्णधार हार्दिक पंड्या (१२) धावबाद झाला.
पहिल्या सामन्यातील हिरो दीपक हुड्डा दुसऱ्या सामन्यात मात्र १२ चेंडूत ९ धावा करत बाद झाला. त्यामुळे अवघ्या ५७ धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला. त्यानंतर आलेल्या अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल ९१ धावांची भागिदारी करुन भारताला विजयच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. मात्र अखेरच्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानका याने फक्त ४ धावा देत भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं.
ADVERTISEMENT