India vs Australia WTC Test : सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) 2023 फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर टीम इंडियाने नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला तब्बल 209 धावांनी पराभूत केले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचे स्वप्न भंगले.
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 हंगाम दोन वर्षे चालला. यामध्ये चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल, तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना झाला.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. गेल्या वेळी साउथेम्प्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि विजेतेपदावर नाव कोरण्यात अपयश आले होते. पण, WTCच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातच घेतली आघाडी
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळवला गेला. इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये येथे कसोटी सामना झाला. या सामन्यात नाणेफेक भारताच्या बाजूने राहिली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >> Ajinkya Rahane : रहाणेची जबरदस्त खेळी, भावूक राधिकाने शेअर केल्या भावना
नाणेफेकीच्या वेळी रोहित म्हणाला होता की, खेळपट्टीवर भरपूर गवत आहे, अशावेळी वेगवान गोलंदाजांची मदत मिळेल. पण जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा परिणाम काही वेगळेच दिसले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 3 विकेट 76 धावांत गमावल्या होत्या. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी क्रीझवर पाऊल ठेवले आणि चौथ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 469 धावांपर्यंत नेली. या डावात हेडने 163 आणि स्मिथने 121 धावा केल्या.
WTC अंतिम सामन्याची स्थिती
ऑस्ट्रेलिया – पहिला डाव: 469, दुसरा डाव: 270/8 (घोषित)
टीम इंडिया – पहिला डाव : 296, दुसरा डाव : 234
दिग्गज ठरले अपयशी
भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती, पण इथेही चाहत्यांची निराशा झाली. कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (14), शुभमन गिल (13), चेतेश्वर पुजारा (14) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. अजिंक्य रहाणेने 89, रवींद्र जडेजाने 48 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा करत संघाची धावसंख्या 296 पर्यंत नेली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची मोठी आघाडी मिळाली.
हेही वाचा >> Mira Road Murder : सरस्वतीच्या हत्येनंतर मनोज साने गुगलवर काय सर्च करत होता?
त्याचवेळी चाहत्यांना कल्पना आली होती की सामना भारताच्या खिशातून गेला आहे. नंतर टीम इंडियाला चमत्काराची गरज होती, पण तेही घडले नाही. 11 आणि 12 जून रोजी लंडनमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलेला होता, पण तोही अंदाजच राहिला.
दुसऱ्या डावातही रोहित-कोहली फैल
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 8 बाद 270 धावा करून डाव घोषित केला. त्यांना पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 444 धावांचे भले मोठे लक्ष्य होते. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात खेळाडूंच्या निराशजनक कामगिरीमुळे सामना हाताबाहेर जाईल, अशी भीती चाहत्यांना होती. आणि तसंच घडलं. कोहली, रोहित, गिल, पुजारा किंवा रहाणे भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
दुसऱ्या डावात भारतीय संघ 234 धावांत गारद झाला आणि सलग दुसऱ्यांदा WTC चॅम्पियन होण्याचे स्वप्नही भंगले. भारतीय संघ हा सामना 209 धावांनी हरला. दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून विराट कोहलीने 49, अजिंक्य रहाणेने 46 आणि रोहित शर्माने 43 धावा केल्या.
ADVERTISEMENT