IND vs SL 3rd T20
ADVERTISEMENT
राजकोट : सूर्यकुमार यादवची वादळी बॅटिंग आणि गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे भारताने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा टी-20 सामना तब्बल ९१ धावांनी जिंकला. या बलाढ्य विजयासह २-१ अशी मालिकाही भारताने खिशात घातली. पुण्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभावाची निराशा झटक भारताने राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील सामन्यात दणदणीत पुनरागमन केलं.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंजादी करण्याचा निर्णय घेतला. सुर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या दोघांनी कर्णधार हार्दिक पांड्याचा हा निर्णय योग्य ठरवतं जोरदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूमध्ये ११२ धावांची वादळी खेळी केली. तर शुभमन गिलनेही ३६ चेंडूत ४६ धावा तडकावल्या. या दोघांनी मिळून १११ धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा स्वस्तात माघारी परतले. २० षटकात भारताने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अडखळत झाली. अक्षर पटेलने पाचव्या षटकात कुशल मेंडिसला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. त्यानंतर ठराविक अंतरात श्रीलंकेच्या विकेट्स पडत गेल्या. श्रीलंकेचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. भारताकडून हार्दिक पांड्या, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
भारताने मालिकाही जिंकली :
तिसऱ्या विजयासह भारताने मालिकाही खिशात घातली. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 मालिका विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवला. भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं दोन धावांनी दणदणीत विजय मिळविला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतावर १६ धावांनी विजय मिळवत श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय होतं, मालिका कोण जिंकत याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
ADVERTISEMENT