भारताचा माजी कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर खूप सक्रिय असतो. क्षेत्ररक्षण करताना चाहत्यांचा उत्साह वाढवण्यात तो पुढे असतो. त्याचबरोबर त्याचा आक्रमक स्वभावही प्रेक्षकांना पाहायला मिळतो. मीरपूर येथील भारत-बांगलादेश मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले. या सामन्यात बांगलादेशी फलंदाज वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करत होता, यावर कोहली संतापला.
ADVERTISEMENT
ही संपूर्ण घटना कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात घडली. त्यावेळी बांगलादेशचा दुसरा डाव सुरू झाला होता. त्यावेळी प्रकाश फारसा चांगला नव्हता, अशा प्रकारे बांगलादेशी फलंदाज वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत होते. सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूनंतर नजमुल हुसेन शांतोने बुटाची लेस बांधण्यास सुरुवात केली. मग काय होतं विराट कोहलीने वेळ वाया घालवल्याबद्दल शांत कसं बसणार होता. कोहलीनं आपली जर्सी ओढत टीशर्ट पण काढ, असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नजमुल हुसेन शांतोने क्रीजवर वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. बांगलादेश दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला तेव्हा नजमुल शांतोने बॅट बदलण्यासाठी डगआऊटकडे बोट दाखवले. 12 वा खेळाडूही बॅट घेऊन मैदानावर आला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शांतोने जुन्या बॅटने खेळणे योग्य मानले.
दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांत गुंडाळला. मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर नजमुल हुसेनने 24 आणि लिटन दासने 25 धावा केल्या. भारताकडून उमेश यादव आणि आर. अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी चार खेळाडूंना बाद केले. प्रत्युत्तरादाखल भारताचीही पहिल्या डावात अत्यंत खराब सुरुवात झाली आणि 100 धावांच्या आत चार विकेट्स गमावल्या.
पंत आणि श्रेयसनं लाज राखली
यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी भागीदारी करत भारताला 314 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऋषभ पंतने 93 आणि श्रेयस अय्यरने 87 धावा केल्या. दोघांच्या या शानदार खेळीचा परिणाम म्हणजे टीम इंडियाला 87 धावांची आघाडीही मिळाली. प्रत्युत्तरात बांगलादेशने दुसऱ्या डावात 100 धावांच्या आत चार विकेट गमावल्या.
ADVERTISEMENT