भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील मर्यादित षटकांची मालिका इंग्लंडविरुद्ध खेळायची आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी T20 आणि ODI संघांची घोषणा केली आहे. या मालिकेनंतर भारताच्या एका स्टार खेळाडूने निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे.
ADVERTISEMENT
ही स्टार आहे वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी. भारतीय महिला संघाला इंग्लंड दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात 10 सप्टेंबरला पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. तर शेवटचा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना झुलनच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.
इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. झुलनची निवड ही केवळ एकदिवसीय मालिकेसाठीच झाली आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, इंग्लंडविरुद्धची तिसरी वनडे म्हणजेच मालिकेतील शेवटची वनडे झुलनचा निरोप घेणारा सामना असणार आहे. हा सामना लॉर्ड्सवर होणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली नाही
अलीकडेच भारतीय महिला संघाने बर्मिंघम, इंग्लंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. यासह संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झुलन गोस्वामीला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पण आता तिची इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीच निवड झाली आहे.
झुलनने या वर्षी 22 मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. एकदिवसीय विश्वचषकाअंतर्गत न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथे हा सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघ 110 धावांनी विजयी झाला होता. ज्यात झुलन गोस्वामीने 19 धावांत 2 बळी घेतले होते. यानंतर जुलैमध्ये श्रीलंका मालिकेसाठी झुलनची निवड झाली नाही.
झुलनचा एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट विक्रम
2002 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या झुलन गोस्वामीने भारतीय संघासाठी आतापर्यंत 12 कसोटी, 201 वनडे आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये तिचे मोठे योगदान आहे. झुलनने या काळात कसोटीत 44, एकदिवसीय सामन्यात 252 आणि टी-20 मध्ये 56 विकेट घेतल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 हून अधिक बळी घेणारी झुलन ही जगातील एकमेव महिला खेळाडू आहे. तसेच, मिताली राज (232) नंतर सर्वाधिक 201 एकदिवसीय सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.
टीम इंडियाचे इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला T20 सामना 10 सप्टेंबर रोजी डरहमच्या रिव्हरसाइड मैदानावर खेळवला जाणार आहे. यानंतर, पुढील दोन सामने डर्बी आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंडवर अनुक्रमे 13 आणि 15 सप्टेंबर रोजी खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी होव्ह येथील सेंट्रल काउंटी मैदानावर खेळवला जाणार आहे. पुढील दोन सामने कॅंटरबरी आणि लॉर्ड्स येथे अनुक्रमे 21 आणि 24 सप्टेंबर रोजी होणार आहेत.
इंग्लंडविरुद्ध भारताचा टी-20 संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सबिनेनी मेघना (wk), राजेश्वरी गायकवाड, हेमलता, सिमरन दिल बहादूर, ऋचा घोष (wk), केपी नवगिरे
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (wk), यस्तिका भाटिया (wk), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, डी. हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्स.
ADVERTISEMENT