महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आयपीएलमध्ये आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. अबुधाबीच्या मैदानावर अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर २ विकेट राखून मात केली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या दोन सामन्यांत आश्वासक कामगिरी करणाऱ्या कोलकात्याने सामन्यात पहिल्यांदा बॅटींग केली. परंतू त्यांची सुरुवात अडखळती झाली. शुबमन गिल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शार्दुल ठाकूरने अय्यरचा अडसर दूर केल्यानंतर ठराविक अंतराने कॅप्टन मॉर्गनही हेजवूडच्या बॉलिंगवर मागारी परतला.
यानंतर राहुल त्रिपाठीने नितीश राणाच्या साथीने बहारदार फटकेबाजी करत धावा जमवण्यास सुरुवात केली. परंतू या फटकेबाजीच्या प्रयत्नात तो जाडेजाच्या बॉलिंगवर आऊट झाला, त्याने ४५ रन्स केल्या. यानंतर कोलकात्याच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १७२ चा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर रविंद्र जाडेजाने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपरकिंग्जची सुरुवात चांगली झाली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस या फॉर्मात असलेल्या जोडीने सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची पार्टनरशीप केल्यानंतर आंद्रे रसेलने गायकवाडला आऊट केलं. यानंतर डु-प्लेसिस आणि मोईन अली यांनी संघाचा डाव सावरला. चेन्नईने शतकी धावसंख्या ओलांडल्यानंतर प्रसिध कृष्णाने फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडलं. यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना झटपट गुंडाळण्यात KKR ला यश आलं.
अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि कॅप्टन धोनी ठराविक अंतराने माघारी परतले. ६ बाद १४२ अशी परिस्थिती असताना कोलकात्याने सामन्यात कमबॅक करत चेन्नईवर दडपण निर्माण केलं. परंतू प्रसिध कृष्णाच्या बॉलिंगवर फटकेबाजी करत रविंद्र जाडेजाने एका क्षणात सामन्याचं पारडं चेन्नईच्या दिशेने झुकवलं. अखेरच्या ओव्हरमध्ये कमी धावा हव्या असतानाही KKR ने जिद्द सोडली नाही. प्रसिध कृष्णाने सॅम करन आणि जाडेजाचा अडसर दूर करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू शार्दुल ठाकूर आणि दीपक चहरने विजयासाठी आवश्यक असलेली एक धाव काढत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
KKR कडून सुनील नरीनने ३ तर प्रसिध कृष्णा-फर्ग्युसन-चक्रवर्ती आणि रसेल या त्रिकुटाने १-१ विकेट घेतली. या विजयासह चेन्नईने १६ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
ADVERTISEMENT