आयपीएलच्या चौदाव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघासमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. संघाचा अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर यंदाचा हंगाम खेळणार नाहीये. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
भारताविरुद्ध दौऱ्यात जोफ्रा आर्चरला दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याच्या आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची एक मेडीकल टीम जोफ्रा आर्चरच्या दुखापतीवर लक्ष ठेवून होती. काही दिवसांपूर्वीच जोफ्राने पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली. यानंतर त्याच्या दुखापतीचं स्वरुप पाहता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चर यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही असं जाहीर केलंय.
IPL 2021 : गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजन स्पर्धेला मुकणार
२९ मार्चरोजी आर्चरवर पहिली शस्त्रक्रीया करण्यात आली. यानंतर राजस्थान रॉयल्सला आर्चर दुसऱ्या टप्प्यात संघात सहभागी होईल अशी आशा होती. परंतू त्यांची ही आशाही फोल ठरली आहे. जोफ्रा आर्चरव्यतिरीक्त इंग्लंडचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे यंदाचा हंगाम खेळू शकणार नाहीये. राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्यात खेळत असताना बेन स्टोक्सला दुखापत झाली होती.
सुरुवातीला स्टोक्स राजस्थान संघासोबतच राहिलं असं ठरवण्यात आलं होतं. परंतू यानंतर स्टोक्सच्या दुखापतीचं स्वरुप पाहता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सला परत बोलावून घेतलं. ज्यामुळे राजस्थानचा संघ आधीच अडचणीत सापडला होता, त्यातच आर्चरनेही माघार घेतल्यामुळे राजस्थानच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. आतापर्यंत झालेल्या ४ मॅचपैकी राजस्थानचा संघ ३ मॅच हरला आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात राजस्थानचा संघ एकमेव सामना जिंकला आहे. गुरुवारी RCB ने राजस्थानचा १० विकेटने धुव्वा उडवला होता.
ADVERTISEMENT