लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजाएंट संघाने आपला चांगला खेळ कायम ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजाएंटने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्सने मात केली आहे. विजयासाठी मिळालेलं १५० धावांचं आव्हान लखनऊने क्विंटन डी-कॉकच्या धुँवाधार ८० धावांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
पहिल्यांदा बॅटींगचा करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने धडाकेबाज सुरुवात केली. विशेषकरुन मुंबईकर पृथ्वी शॉने फटकेबाजी करत दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात दिल्लीकडून पदार्पण करणारा डेव्हीड वॉर्नर या भागीदारीत फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसला. पृथ्वी शॉने सर्वाधिक काळ स्ट्राईक आपल्याकडे ठेवत चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केल्यानंतर कृष्णप्पा गौथमने पृथ्वी शॉचा अडसर दूर केला.
पृथ्वीने ३४ बॉलमध्ये ९ फोर आणि २ सिक्स लगावत ६१ धावांची खेळी केली. यानंतर डेव्हीड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेलही लागोपाठ रवी बिश्नोईच्या बॉलिंगवर माघारी परतले. यानंतर ऋषभ पंत आणि सर्फराज खान यांनी दिल्लीच्या डावाला चांगला आकार दिला. परंतू मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यात हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे दिल्लीला १४९ धावांवर रोखण्यात लखनऊला यश आलं.
प्रत्युत्तरादाखल लखनऊ संघानेही धडाकेबाज सुरुवात केली. क्विंटन डी-कॉकने पहिल्या ओव्हरपासून दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेऊन काही चांगले फटके खेळले. पहिल्या विकेटसाठी डी-कॉक आणि राहुलने ७३ धावांची भागीदारी केल्यानंतर राहुल कुलदीप यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर एविन लुईसच्या साथीने डी-कॉकने आपलं अर्धशतक पूर्ण करत सामन्यावर आपल्या संघाची पकड मजबूत राहिल याची काळजी घेतली.
ललित यादवने लुईसला आऊट करत लखनऊला दुसरा धक्का दिला. परंतू दुसऱ्या बाजूने डी-कॉकने आपला लढा कायम ठेवला होता. नवी मुंबईच्या मैदानावर सुरेख फटकेबाजी करत डी-कॉकने दिल्लीच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. कुलदीपने डी-कॉकला आऊट करत सामन्यात रंगत निर्माण केली. डी-कॉकने ८० धावा केल्या. ठराविक अंतराने दीपक हुडादेखील शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर आऊट झाला. परंतू यानंतर कृणाल पांड्या आणि आयुष बदोनी यांनी जास्तीची जोखीम न पक्तरता अखेरच्या ओव्हरपर्यंत सामना नेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT