इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्या सत्रात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने बीडचा अक्षय शिंदे याला अस्मान दाखवले. पृथ्वीराजने एकेरी पटाने अक्षय याच्यावर सहा विरुद्ध चार अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
दोस्तीतील कुस्तीत शेख ठरला सिकंदर
अमरावतीचा पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध वाशिमचा पैलवान सिकंदर शेख या जिगरी दोस्तांमध्ये माती गटात सेमी फायनलची कुस्ती झाली. हे दोघेही कोल्हापूर येथील गांगवेश तालमीत सराव करतात. त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहीत होते. या लढतीत सिकंदर शेख याने माऊली जमदाडे याला चितपट केले. या लढतीत सिकंदर याने ६ विरुद्ध १ गुणांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मागील तीन दिवसांपासून सुरुवात झाली. साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. परंतु, सातऱ्यात सुरू झालेल्या अवकाळी आणि वादळी पावसामुळं या स्पर्धेला मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय. या अवकाळी पावसामुळं महाराष्ट्र केसरी कुस्तीचा स्टेज कोसळल्यानं आजच्या लढती उद्या खेळल्या जाणार हे शुक्रवारीच निश्चित करण्यात आलं होतं.
५ एप्रिलपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. तब्बल ५९ वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. ज्यामुळं सातऱ्यामधील कुस्ती शौकिनांना मोठा आनंद झाला. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी ९०० पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र, आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. शुक्रवारी जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शुक्रवारच्या स्पर्धा आज घेण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT