श्रेयस अय्यरच्या 44 चेंडूत केलेल्या आक्रमक 73 धावांच्या जोरावर गुरुवारी मुंबईच्या संघाने विदर्भाचा पाच गडी राखून पराभव करून सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी अंतिम फेरीत मुंबईचा सामना हिमाचल प्रदेशशी होणार आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला होता. परंतु फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ (21 चेंडूत 34) आणि अय्यरने 16.5 षटकांत संघाला विजय मिळवून दिला. यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माच्या 24 चेंडूंत नाबाद 46 धावांच्या जोरावर विदर्भाने सात बाद 164 धावा केल्या.
ADVERTISEMENT
अय्यरने चमकदार कामगिरी केली आणि या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी सरावही केला. या खेळीत त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्याशिवाय सरफराज खाननेही 19 चेंडूत 27 धावा केल्या.
शिवम दुबेने चार चेंडूंत दोन चौकार मारून खेळ पूर्ण केला आणि १३ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भाचा पराभव करून हे यश संपादन केले, तर हिमाचलने या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत पंजाबचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे.
श्रेयसने 73 धावांची खेळी खेळली
विजयासाठी 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने लवकरच पहिली विकेट गमवाली.कर्णधार अजिंक्य रहाणे 5 धावा करुन बाद झाला. रहाणेने पृथ्वी शॉसोबत डावाची सुरुवात केली होती. यानंतर जैस्वालही १२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारली आणि पृथ्वी शॉसोबत 43 धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर पृथ्वी शॉ 21 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 34 धावांची जलद खेळी करत बाद झाला.
श्रेयस अय्यरने सरफराज खानसह चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या मार्गावर आणले, मात्र ४४ चेंडूंत ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी करून तो बाद झाला. त्याचवेळी सर्फराज खाननेही 19 चेंडूंत 1 षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या आणि तो बाद झाला. यानंतर शिवम दुबेने नाबाद 13 तर शम्स मुलाणीने नाबाद 1 धावांची खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
हिमाचल विरुद्ध फायनल
सुमीत वर्माचे अर्धशतक आणि ऋषी धवनच्या तीन बळींच्या जोरावर हिमाचल प्रदेशने पंजाबवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता हिमाचल प्रदेश आणि मुंबई यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
ADVERTISEMENT