ज्या वयात क्रिकेटपटू किंवा कोणतेही खेळाडू हे सर्वसाधारणपणे निवृत्तीचा विचार करतात त्यावेळी एक खेळाडू आयपीएलच्या मैदानात उतरला आणि फार कमी कालावधीत त्याने संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. तुमच्यात जिद्द आणि मेहनत घ्यायची ताकद असेल तर Age is just a number हे वाक्य मुंबईच्या प्रवीण तांबेने तंतोतंत खरं करुन दाखवलं. मुंबईच्या मध्यमवर्गीय घरांत वाढलेला आणि आयुष्यभर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बाळगलेल्या प्रवीण तांबेच्या आयुष्यावरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
ADVERTISEMENT
कौन प्रवीण तांबे? हा सिनेमा आजपासून हॉटस्टार या App वर आला आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने यात प्रवीण तांबेची भूमिका साकारली असून या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या निमीत्ताने मुंबई तक ने क्रिकेटपटू प्रवीण तांबेशी संवाद साधून त्याच्या या चित्रपटाविषयीच्या भावना आणि आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेतलं.
१) तुमच्यावर चित्रपट काढायचा आहे हे जेव्हा समजलं तेव्हा तुमची भावना काय होती आणि या चित्रपटातून प्रेक्षकांना काय पहायला मिळेल?
– मला खरंच खूप आनंद झाला. या चित्रपटातून इतरांना काय मिळेल असं विचारलं तर त्याचं उत्तर असेल जिद्द. ही कथा माझी एकट्याची नाही, मुंबईत माझ्यासारखे असे अनेक खेळाडू आहेत की ते आजही स्थानिक पातळीवर टेनिस आणि रबरी बॉलवरच्या स्पर्धा खेळतात. यातल्या अनेक खेळाडूंकडे प्रचंड टॅलेंट आहे. मुंबईतल्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येकाला मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही. माझ्या चित्रपटातही लोकांना हेच पहायला मिळेल. अनेकदा संधी न मिळाल्यामुळे स्थानिक पातळीवरचे खेळाडू निराश होतात, खेळणं सोडून देतात…पण हा चित्रपट तुम्हाला खचून न जाता जिद्द मनात ठेवून अधिक मेहनत करण्यासाठीचं बळ देईल.
यात आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ही कथा जरी माझी असली तरीही यात माझ्या परिवाराचा मला पाठींबा होता. तुमचा परिवार प्रत्येकवेळी काही ना काही गोष्टी तुमच्यासाठी सॅक्रीफाईज करत असतो. त्यामुळे तुम्हालाही तुमचा खेळ आणि घरातली जबाबदारी या गोष्टींचा मेळ साधून पुढे जायचं असतं.
२) तुमची कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायची आहे असं तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा त्यावर विश्वास बसला होता का?
– मला खरंतर तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला होता. मी ४१ व्या वर्षात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तिकडे मी केलेल्या कामगिरीच्या जोरावर माझं नाव व्हायला लागलं. नंतर हळूहळू मी कॅरिबीअन आणि इतर लिग मध्ये खेळायला लागलो, तिकडे मी हॅटट्रीक घेतली…त्यामुळे माझं नाव झालं होतं. पण जेव्हा मला या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा माझी पहिली प्रतिक्रीया होती की, मी तर आताच खेळायला सुरुवात केली आहे, मी एवढा मोठा खेळाडू झालो नाहीये… पण, चित्रपटाचे निर्माते सुदीप तिवारी हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यांनी मला यासाठी कन्विन्स करुन या कामाला सुरुवात केली आणि आज ते लोकांसमोर आलंय.
३) या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राहुल द्रविडला तुमच्याविषयी बोलताना दाखवले आहेत, त्यांच्यासोबत तुमच्या पहिल्या भेटीचा अनुभव कसा होता?
– मी डी.वाय.पाटील टी-२० स्पर्धेत खेळायचो त्यावेळी मला राहुल द्रविड सरांच्या टीममधील एकाने पाहिलं होतं. यानंतर मला आयपीएलसाठी जयपूरमध्ये सिलेक्शन ट्रायलला बोलावण्यात आलं. त्यादरम्यान राहुल द्रविड सरांनी माझ्या वयाबद्दल मला कधीच काहीही विचारलं नाही किंवा सांगितलं नाही. मी तुझा खेळ पाहून तुला संघात घेतो आहे असं ते मला म्हणाले आणि माझ्यासाठी ही खूप मोठी पावती होती. त्यांचे ते शब्द खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी होते. ती भावना आता शब्दांत मांडता येणार नाही. भारतातल्या प्रत्येक खेळाडूसाठी राहुल द्रविड हे इन्स्पिरेशन आहेत. ज्यावेळी कार्यक्रमात त्यांनी माझ्या नावाचा आणि संघर्षाबद्दलचा उल्लेख केला तेव्हा मला खरंच खूप भरुन आलं.
४) तुम्ही तुमच्या आयुष्यातला बहुतांश काळ टेनिस क्रिकेट खेळून काढलात, त्यावेळी मिळणारं बक्षीस आणि आता आयपीएल-चित्रपटांमधून मिळालेली कमाई यात काय फरक जाणवतो?
– महत्वाची गोष्ट म्हणजे मी तेव्हा कधीच पैश्यासाठी खेळायचो नाही. तो काळच खूप वेगळा होता. तेव्हा स्पर्धेत चांगली कामगिरी झाली की मिक्सर मिळायचा, कधी गाडी मिळायची. मला स्थानिक स्पर्धांमधून अनेक गाड्या मिळाल्या आहेत. परंतू त्या काळात मी जिंकलेल्या मिक्सरचा घरात खूप महत्व असायचं.
५) चित्रपट आल्यानंतर घरच्यांच्या आणि विशेषकरुन तुमच्या मुलांच्या काय प्रतिक्रीया होत्या?
– मी जेव्हा आयपीएलमध्ये डेब्यू केला, हेच त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं. कारण मी खेळायला लागल्यापासून माझा परिवार माझ्यासोबत आहे आणि त्यांनी माझा संघर्ष पहायला मिळाला. माझा मुलगा आता इंजिनीअरिंग करतोय आणि मुलगी दहावीत आहे. पण आपले बाबा वयाच्या ४१ व्या वर्षात पाठीवर क्रिकेट किट घेऊन मुंबईच्या लोकल मधून प्रवास करतायत, मैदानात जाऊन खेळतायत हे त्यांनी पाहिलं आहे. या इतक्या संघर्षानंतर आयपीएलमध्ये जेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा माझ्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
माझ्यावर चित्रपट आल्यानंतरही ते खूप आनंदात आहेत. त्यांचे मित्र-मैत्रिणी त्यांना या चित्रपटाबद्दल विचारतात तेव्हा ती हक्काने मला येऊन सांगतात.
६) तुमच्यासारखे प्रवीण तांबे अजुनही मुंबई शहरात आहेत, त्यांना काय सल्ला द्याल?
– मी जसं सुरुवातीला म्हणालो तसंच, की ही माझी एकट्याची कहाणी नाहीये. माझ्यासारखे अनेक खेळाडू आजही मुंबई शहरात आहेत. त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर आहे, पण ते लपलं जातं. मी त्यांना हाच सल्ला देईन की आयुष्यभरासाठी टेनिस क्रिकेट खेळत राहू नका, तुमच्यातलं टॅलेंट हे मोठ्या पातळीवर योग्य वेळेत घेऊन जाणं देखील महत्वाचं असतं. क्रिकेट खेळत असताना घराची जबाबदारी सांभाळणंही महत्वाचं आहे. असं कुठलंतरी काम पाहा की तिकडे तुम्हाला क्रिकेटही खेळायला मिळेल आणि कामही करता येईल. या प्रवासात तुमच्या घरच्यांची तुम्हाला साथ असणं गरजेचं आहे. त्यामुळे क्रिकेटसोबत घर सांभाळणं देखील महत्वाचं आहे. आजकाल मुलांमध्ये स्ट्रेस लेवल वाढल्याचं मी पाहतो, संधी मिळाली नाही की ते खेळ सोडून देतात. पण माझ्या या चित्रपटातून त्यांना सतत मेहनत करत राहण्याची प्रेरणा मिळेल.
ADVERTISEMENT