पुणे : आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत नातू रोहित पवार यांनीही क्रिकेटच्या राजकारणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार क्लब गटातून विजयी झाले असून ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य बनले आहेत. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर १६ सदस्यीय कमिटीची आज (रविवारी) दुपारी एक बैठक पार पडली. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. रोहित पवार यांच्याविरोधात कोणीही अर्ज भरला नाही, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची निवड झाली. त्यामुळे आजोबा शरद पवारांनंतर आता रोहित पवारांचीही आता क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री झाली आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षांशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड आज करण्यात आली. यात सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेना (UBT) पक्षाचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स काऊंन्सिल मेंबर मिलिंद नार्वेकर यांनी या सर्वांचे ट्विट करुन अभिनंदन केले आणि सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर रोहित पवार ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, मा. अजितदादा आणि सुप्रियाताई यांचा पाठिंबा, तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली.
उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत,सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं. क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. पुनश्च सर्वांचे आभार!
ADVERTISEMENT