रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात अजुनही विजयी सूर सापडलेला नाहीये. पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर ५ विकेट राखून मात केली आहे. पॅट कमिन्सने धुँवाधार फलंदाजी करत पुण्यात षटकारांचा पाऊस पाडत सामना मुंबईच्या हातून हिसकावून घेतला.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार रोहित शर्मा उमेश यादवच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. यानंतर इशान किशन आणि मुंबईकडून पदार्पण करणारा डेवाल्ड ब्रेविसने छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. ब्रेविसने काही सुरेख फटके लगावले. वरुण चक्रवर्तीने ब्रेविसला माघारी धाडत मुंबईला दुसरा धक्का दिला. पाठोपाठ ठराविक अंतराने इशान किशनही पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर माघारी परतला.
यानंतर संकटात सापडलेल्या मुंबईला सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सावरलं. दोघांनीही अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजीला सुरुवात करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. सूर्यकुमार यादव ५२ धावांची खेळी करत अखेरच्या ओव्हरमध्ये बाद झाला. यानंतर तिलक आणि पोलार्डने संघाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला. कोलकात्याकडून पॅट कमिन्सने २ तर उमेश यादव आणि वरुण चक्रवर्तीने १-१ विकेट घेतली.
IPL 2022: फक्त खेळाडू नाही मैदानाची काळजी घेणाऱ्या Groundman ना ही आता फाईव्हस्टार ट्रिटमेंट
प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. टायमल मिल्सने अजिंक्य रहाणेला आऊट करत KKR ला पहिला धक्का दिला. यानंतर मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सनी KKR च्या मधल्या फळीला वारंवार धक्के देत सामन्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं. श्रेयस अय्यर, सॅम बिलींग्ज, नितीश राणा आणि आंद्रे रसेल हे ठराविक अंतराने माघारी परतले.
परंतू यानंतर मैदानात आलेल्या पॅट कमिन्सने सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. मुंबईच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत कमिन्सने पुण्यात षटकारांचा पाऊस पाडला. ज्यामुळे एका क्षणाला हातात आलेला सामना काही क्षणात KKR च्या पारड्यात गेला. केवळ १५ बॉलमध्ये ६ षटकार आणि ४ चौकारांच्या सहाय्याने कमिन्सने नाबाद ५६ धावांची खेळी करत मुंबईच्या हातातला विजयाचा घास हिसकावून घेतला. व्यंकटेश अय्यरनेही नाबाद ५० धावा करत कमिन्सला चांगली साथ दिली. मुंबईकडून मिल्स आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी २-२ तर सम्सने १ विकेट घेतली.
ADVERTISEMENT