Rahul Dravid News : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे टीम इंडियाचे तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा करारही संपला. पण, द्रविडला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. त्यातच आता महत्त्वाची माहिती समोर येतेय ती म्हणजे बीसीसीआय द्रविडला मुदतवाढ देण्याच्या विचारात नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या ऐवजी एका माजी खेळाडूवर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. (the contract of Team India head coach Rahul Dravid ended)
ADVERTISEMENT
हा अनुभवी खेळाडू होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!
दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) T20 विश्वचषक 2024 डोळ्यासमोर ठेवून NCA प्रमुख VVS लक्ष्मणकडे ही जबाबदारी सोपवण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि राहुल द्रविड यांच्यात मुख्य प्रशिक्षकाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली. द्रविडने जेव्हा ब्रेक घेतला तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. 49 वर्षीय लक्ष्मण सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
हेही वाचा >> IPL Transfer Window 2024 : हार्दिक पांड्याची घरवापसी, मुंबई इंडियन्स मोजणार इतके ‘कोटी’?
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘राहुल आणि बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली, आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करू. सगळ्यांना असं वाटतंय की, टी-२० विश्वचषक सात-आठ महिन्यांत होणार आहे, त्यामुळे नव्या प्रशिक्षकाला येऊन संघ तयार करायला आणि प्रक्रिया ठरवायला वेळ लागेल. द्रविडला याची पूर्ण जाणीव आहे.’
हेही वाचा >> Virat Kohli-Rohit Sharma : गुडन्यूज! विराट-रोहितला वर्ल्ड कपमधील कामगिरीचं मिळालं फळ
टीम इंडिया गेल्या दोन वर्षांत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकली नसली, द्रविडने कर्णधार रोहित शर्मासोबत ज्या प्रकारे काम केले आहे, त्याबद्दल बोर्ड खूश आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुख्य प्रशिक्षकासाठी पर्याय खुले आहेत. त्याला (लक्ष्मण) संघ, खेळाडू आणि प्रशिक्षण पद्धतीची माहिती आहे. त्याला राष्ट्रीय संघात काम करण्याचा अनुभवही आहे.’
याबद्दल आणखी माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही सध्याचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांचा टी-२० विश्वचषकात सहभाग आवश्यक आहे की नाही यावरही चर्चा करत आहोत. आम्ही लवकरच निर्णय घेऊ अशी आशा आहे, जेणेकरून गोष्टी अधिक स्पष्ट होतील.”
‘या’ दोन आयपीएल संघांनी द्रविडला दिली ऑफर
राहुल द्रविड आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) सोबत चर्चा करत असल्याची माहिती आहे. जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर द्रविड आयपीएल 2024 पूर्वी एलएसजीचा मार्गदर्शक बनू शकतो. दुसरीकडे, 2008 ची आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (RR) देखील राहुल द्रविडला संघासोबत जोडू इच्छिते. राजस्थान रॉयल्सलाही द्रविडला संघाचा मेंटॉर बनवायचे आहे. द्रविड यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेत दिसला आहे. द्रविडने भारत-ए आणि एनसीएमध्ये दीर्घकाळ काम केले आहे.
50 वर्षीय द्रविड 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला होता. द्रविडच्या दोन वर्षांच्या कोचिंग कार्यकाळात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, मात्र द्विपक्षीय सामन्यांमध्ये संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारत सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली होती, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव केला.
ADVERTISEMENT