भारतात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर मध्यावधीमध्ये स्थगित करावा लागलेला आयपीएलचा चौदावा हंगाम बीसीसीआयने आता युएईला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयची आज विशेष सर्वसाधारण सभा पार पडली, या बैठकीत उर्वरित हंगाम युएईमध्ये आयोजित करण्याबद्दल एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. भारतात भविष्यात येऊ शकणारी कोरोनाची तिसरी लाट आणि मान्सून सिझनचा अंदाज घेता बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दल माहिती दिली. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत ही स्पर्धा युएईत खेळवली जाणार आहे. चौदाव्या सिझनमध्ये २९ सामने खेळवण्यात आल्यानंतर बीसीसीआयला सामने स्थगित करावे लागले होते. सुरुवातीला KKR चा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर Bio Secure Bubble मोडलं जाण्याचा मुद्दा समोर आला आणि इतर संघातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली.
भारताचा इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर बीसीसीआय ही स्पर्धा युएईत खेळवणार आहे. “उर्वरित हंगामाबद्दल आम्ही युएई क्रिकेट बोर्डाशी बोललो आहोत आणि त्यांनी सामने आयोजित करण्याची तयारी दाखवली आहे. दुबई, शारजाह आणि अबुधाबी या तीन शहरांमध्ये सामने मागच्या हंगामाप्रमाणे खेळवले जातील. आता बीसीसीआय इतर क्रिकेट बोर्डांशी चर्चा करुन त्यांचे खेळाडू या स्पर्धेला सहभागी होण्याबद्दल तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल.” बीसीसीआयमधील सूत्राने ANI शी बोलताना माहिती दिली.
ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत टी-२० विश्वचषकाचं आयोजनही भारतात करण्यात येणार आहे. परंतू कोरोनामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयसीसीने १ जूनला या संदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत ही स्पर्धा भारतामध्येच आयोजित करायची की युएईला शिफ्ट करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. भारतात आयोजन शक्य झालं नाही तर युएई हा आयसीसीने दिलेला अधिकृत पर्याय आहे. दरम्यान आज पार पडलेल्या BCCI च्या बैठकीत सर्व सभासदांनी टी-२० विश्वचषाच्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीकडे अधिक वेळ मागण्याचं ठरवलं आहे.
दरम्यान, आयपीएल स्पर्धा मध्यावधीत स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयवर आर्थिक नुकसानीचं संकट कोसळलं होतं. यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला २ ते अडीच हजार कोटींचा फटका सहन करावा लागणार होता. परंतू उर्वरित हंगाम युएईला शिफ्ट करत बीसीसीआयने या नुकसानीतून स्वतःचा वाचवण्याचा मार्ग शोधला आहे.
ADVERTISEMENT