टीम इंडियावर आता यापुढील काहीकाळ मुंबईच्या रोहित शर्माची सत्ता असणार आहे. विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितकडे टी-२० आणि वन-डे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. यानंतर आता रोहितकडे भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत १-२ या पराभवानंतर आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
ADVERTISEMENT
३४ वर्षीय रोहित शर्मासमोर पहिली परीक्षा ही मार्च महिन्यात असणार आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येत असून तो मार्च महिन्यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा टी-२० सामना २० फेब्रुवारीला संपल्यानंतर भारतीय संघ २४ तारखेपासून श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. काही दिवसांपासून कसोटी संघासाठी लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत या नावांचा विचार केला जात असला तरीही बीसीसीआय आणि निवड समितीने अनुभवी रोहित शर्मालाच आपली पसंती दिली आहे.
आतापर्यंत ४३ कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नावावर ३ हजार ४७ धावा जमा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितची सरासरी ४६.८७ असून त्याच्या नावावर कसोटीत ८ शतकं आणि १४ अर्धशतकं जमा आहेत. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT