सेंच्युरिअन कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचं विमान लगेच दुसऱ्या सामन्यात जमिनीवर आलं आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाची पहिल्याच दिवशी दाणादाण उडाली आहे. आफ्रिकन गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा पहिला डाव २०२ धावांत आटोपला आहे.
ADVERTISEMENT
कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक, मयांक अग्रवालची आक्रमक सुरुवात, विहारी-पंत आणि आश्विनने मधल्या फळीत दाखवलेला संयम आणि जसप्रीत बुमराहने अखेरच्या क्षणांमध्ये केलेली फटकेबाजी या जोरावर भारताने या सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला.
टॉस जिंकून भारताचा कर्णधार लोकेश राहुलने बॅटींगचा निर्णय घेतला. यानंतर अग्रवाल आणि लोकेश राहुल जोडीने भारताला संयमी सुरुवात करुन दिली. मयांक अग्रवालने मैदानात जम बसवल्यानंतर काही सुरेख फटके लगावलेही, परंतू जेन्सनच्या बॉलिंगवर तो २६ धावा काढून माघारी परतला. यानंतर खराब कामगिरीनंतरही दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या पुजारा आणि रहाणेने निराशाच केली. पुजारा ३ धावा काढून तर अजिंक्य भोपळाही न फोडता ऑलिव्हरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हनुमा विहारीने लोकेश राहुलची साथ दिली.
दुसऱ्या सत्रात रबाडाने हनुमा विहारीला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला. एका बाजूला पडझड होत असताना कर्णधार लोकेश राहुल एक बाजू लावून उभा होता. यादरम्यान त्याने आपलं अर्धशतकही साजरं केलं. परंतू जेन्सनच्या यॉर्कर बॉलने त्याचा घात केला. ५० धावा काढून तो ही माघारी परतला. यानंतर ठराविक अंतराने भारतीय संघाच्या विकेट्स पडत गेल्या.
अखेरच्या फळीत आश्विनने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराहने शेवटच्या क्षणांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेकडून जेन्सनने ४ तर ऑलिव्हर आणि रबाडा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.
ADVERTISEMENT