वॉशिंग्टन सुंदर…ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुल ठाकूरच्या सोबतीने टीम इंडियाचा डाव सांभाळणारा युवा खेळाडू. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सिरीजमध्ये वॉशिंग्टनला नेट्स बॉलर म्हणून थांबवण्यात आलं. पण टीम इंडियाच्यामागे दुखापतींचं सत्र लागलं आणि अनपेक्षितपणे वॉशिंग्टनला ब्रिस्बेन टेस्ट मॅचमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स आणि ६२ रन्सची इनिंग खेळत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ADVERTISEMENT
आतापर्यंत अनेकांना तामिळनाडूच्या या गुणी खेळाडूचं नाव वॉशिंग्टन का आहे असा प्रश्न पडला असेल. यावरुन अनेक तर्क-वितर्कही लढवले जातात. आज आपण वॉशिंग्टनच्या नावामागची कहाणी जाणून घेऊयात…
वॉशिंग्टनचे वडील एम. सुंदर यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या नावामागची कहाणी सांगितली होती. तामिळनाडूच्या त्रिपलीकेन भागात राहणारं सुंदर यांचं कुटुंब…त्यांच्या घरापासून काही अंतरावर पी.डी. वॉशिंग्टन नावाचे माजी लष्करी अधिकारी रहायचे. वॉशिंग्टनचे वडील मरीना बिचवर क्रिकेट खेळायला जाताना पी.डी. वॉशिंग्टनही त्यांचा खेळ पहायला जायचे. यानंतर दोघांमध्येही घनिष्ट मैत्री तयार झाली. याच मैत्रीतून पी. डी. वॉशिंग्टन यांनी सुंदर यांच्याकडे आपल्या पहिल्या मुलाचं नाव वॉशिंग्टन ठेवण्याची मागणी केली. इतकच नव्हे जर तुला दुसरा मुलगा झाला तर त्याचंही नावही तू वॉशिंग्टन ज्युनिअर ठेवायचं असं वचन त्यांनी आपल्या मित्राकडून घेतलं.
सुंदर यांच्या प्रत्येक खडतर काळात पी.डी. वॉशिंग्टन यांनी त्यांची साथ दिली. १९९९ साली वॉशिंग्टन यांचं निधन झालं आणि काही महिन्यांनी एम. सुंदर यांना मुलगा झाला. यानंतर सुंदर यांनीही आपल्या मित्राला दिलेला शब्द पाळायचं ठरवलं. हिंदू रिती रिवाजानुसार बाळाचं बारसं करुन त्याचं नाव श्रीनीवासन असं ठेवलं. पण आपल्या मित्राच्या आठवणीत सुंदर यांनी पहिल्या बाळाचं कागदोपत्री नाव वॉशिंग्टन असं ठेवलं.
वॉशिंग्टन सुंदर हे नाव ऐकलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो IPL मध्ये विराटच्या संघाकडून खेळणारा स्पिनर…पण अनेकांना माहिती नसेल की वॉशिंग्टन सुंदर हा तितकाच चांगली बॅटींगही करतो. तामिळनाडूकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना वॉशिंग्टनने अनेक सामन्यात ओपनिंगला येऊन बॅटींग केली आहे. ब्रिस्बेनमध्ये शार्दुल ठाकूरच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत पुन्हा एकदा त्याने आपली निवड सार्थ ठरवला.
ADVERTISEMENT