Tokyo Olympics 2020: ‘हे’ आहेत भारताचे ढाणे वाघ, ज्यांनी 41 वर्षानंतर भारतीय हॉकीला मिळवून दिलं पदक

मुंबई तक

• 05:11 AM • 05 Aug 2021

टोकियो: भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने (Team India) जवळपास 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावलं आहे. भारतीय संघाने या सामन्यात जर्मनीचा 5-4 असा पराभव केला आहे. सुरुवातीला मागे पडल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले […]

Mumbaitak
follow google news

टोकियो: भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने (Team India) जवळपास 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावलं आहे.

हे वाचलं का?

भारतीय संघाने या सामन्यात जर्मनीचा 5-4 असा पराभव केला आहे. सुरुवातीला मागे पडल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि पदकही पटकावलं आहे.

भारतीय हॉकीने पुन्हा एकदा देशाचे नाव उज्ज्वल करत आहे. अशा परिस्थितीत आजचा क्षण भारतासाठी ऐतिहासिक आहे. इतिहास रचणारा टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू हिरो बनला आहे. हे देशाचे तेच ढाणे वाघ आहेत ज्यांनी भारतीय हॉकीसाठी खूप मोठं यश मिळवून दिलं आहे.

जाणून घ्या टीम इंडियाचे हे ढाणे वाघ आहेत तरी कोण:

मनप्रीत सिंग: इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार 29 वर्षीय मनप्रीत सिंगने आपली उपयुक्तता साध्य केली आहे. मनप्रीतने वयाच्या 19व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. विरोधी संघाच्या डिफेन्समधील भेद शोधण्यात माहीर असलेला मनप्रीत हा मागील काही वर्षांपासून टीम इंडियाचा अभिमान आहे. ज्याने तब्बल 41 वर्षानंतर भारतीय संघाला पदक मिळवून देण्यात अत्यंत मोठी भूमिका बजावली आहे.

पी. आर श्रीजेश: पी. आर. श्रीजेश हा संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहे. गोलकीपर श्रीजेशने यावेळी जवळजवळ डझनभर गोल वाचवले आहेत. ज्याच्या आधारावर टीम इंडियाने कांस्य पदकापर्यंत मजल मारली आहे. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचा तो कर्णधार देखील होता. मूळचा केरळचा असलेल्या श्रीजेशने 2006 मध्ये भारतीय हॉकीत पदार्पण केले होते.

हरमनप्रीत सिंग: 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कप जिंकणारा हरमनप्रीत सिंग रिओ ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचाही एक भाग होता. हरमनप्रीतने जर्मनीविरुद्धच्या कांस्यपदकाच्या सामन्यात गोल केला आहे. हरमनप्रीत हा भारतीय संघाचा पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट आहे.

रुपिंदर पाल सिंह: 31 वर्षीय डिफेंडर रुपिंदरला ड्रॅग फ्लिकर असेही म्हणतात. या ऑलिम्पिकमध्येही त्याने पेनल्टी कॉर्नर दरम्यान संघासाठी अनेक गोल केले. रुपिंदर 2018 पासून टीम इंडियासोबत आहे. त्याच्या उंचीमुळे संघाला त्याचा बराच लाभ मिळतो.

सुरेंद्र कुमार: हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या सुरेंद्रने टीम इंडियामध्ये येताच छाप पाडली. हरियाणाच्या सुरेंद्रने एशियन गेम्स, रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. आज जेव्हा संघ जिंकला आहे तेव्हा त्यांच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण आहे. सुरेंद्र कुमार हा भारतीय संघाच्या बचावाचा कणा आहे.

अमित रोहिदास: 2013 मध्ये पदार्पण करणाऱ्या अमितच्या कारकीर्दीत खूपच चढ-उतार पाहायला मिळाले. तो बराच काळ टीमबाहेर होता. पण हॉकी इंडिया लीगमध्ये स्वत: ला सिद्ध केल्यानंतर तो पुन्हा एकदा संघात परत आला आणि 2017 पासून तो टीम इंडियाच्या बचावासाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे.

बीरेंद्र लाकरा: बीरेंदरचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे, ज्याने सुमारे 200 सामने खेळले आहेत. त्याने पहिल्या लंडन ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. पण शस्त्रक्रियेमुळे तो रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळू शकला नाही. ओडिशातून आलेला बीरेंद्र हा बचावपटू आहे, पण तो संघाच्या गरजेनुसार मिडफिल्डर म्हणूनही खेळतो.

हार्दिक सिंह: 22 वर्षीय तरुण हार्दिकने या ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवला आहे. उपांत्यपूर्व फेरीत हार्दिकचा गोल संघासाठी खूप महत्त्वाचा ठरला होता. 2018 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने खूप कमी वेळात स्वतःला एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे.

विवेकसिंग प्रसाद: भारतीय संघाचा प्रतिभावान मिडफिल्डर विवेक त्याच्या समजूतदारपणासाठी ओळखला जातो. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी 2018 मध्ये टीम इंडियामध्ये आलेला विवेक पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. टोकियोमध्ये त्याने फॉरवर्ड लाईनची जबाबदारी सांभाळली आणि संघातील खेळाडूंना चांगली साथ दिली.

नीलकंठा शर्मा: 2016 च्या ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धेत आपली चमक दाखवल्यानंतर, नीलकंठाने वरिष्ठ संघात स्थान मिळवले. 26 वर्षीय मिडफिल्डर जो मूळचा मणिपूरचा आहे. त्याने गेल्या तीन वर्षांत अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

सुमीत वाल्मिकी: हरियाणातील सोनिपतचा असलेला सुमित हा त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. सुमीत 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा एक भाग आहे. गरिबीशी झगडत टीम इंडियापर्यंत मजल मारणाऱ्या सुमीतला हॉकीमध्ये करिअर करण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला होता.

शमशेर सिंग: जेव्हा शमशेर सिंगचे नाव ऑलिम्पिक संघात आले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले होत. शमशेर, फक्त 24 वर्षांचा आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील अटारी सीमेजवळील गावातून येतो. केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला शमशेर हा टीम इंडियाचा सरप्राईज पॅकेज आहे.

दिलप्रीत सिंग: पंजाबच्या दिलप्रीत सिंगने 2018 मध्ये संघात पाऊल ठेवले आणि त्यानंतर प्रत्येक प्रमुख स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, मग ती राष्ट्रकुल खेळ असो किंवा आशियाई खेळ आणि विश्वचषक. कोणताही अनुभव नसतानाही तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे.

गुरजंत सिंग: जेव्हा टीम इंडियाने ज्युनियर वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवला होता तेव्हा गुरजंत सिंग सर्वात मोठा स्टार म्हणून उदयास आला होता. यानंतर, त्याला टीम इंडियामध्ये प्रवेश मिळाला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्येही गुरजंत सिंगने महत्त्वाच्या क्षणी एक गोल केला आणि टीम इंडियाला पदकाच्या उंबरठ्यावर नेले.

पदकांचा दुष्काळ संपला ! Tokyo Olympics मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक

मनदीप सिंग: 26 वर्षीय मनदीप सिंग हा फॉरवर्ड पोझिशनची शान आहे, ज्याने संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये भारतीय आक्रमणाचे नेतृत्व केले आहे. 2012 मध्ये पदार्पण करणाऱ्या मनदीपने हॉकी इंडिया लीगमध्ये चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला. त्यानंतर तो 150 पेक्षा जास्त सामने खेळला आहे.

    follow whatsapp