BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सौरव गांगुली विराटवर नाराज झाला होता. ज्यानंतर त्याने विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी केली होती. परंतू सचिव जय शहा यांच्या मध्यस्थीमुळे ही नोटीस पाठवण्यात आली नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये आलं होतं.
ADVERTISEMENT
परंतू इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना सौरव गांगुलीने हे वृत्त चुकीचं असून यात जरासंही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.
काय होता नेमका वाद? जाणून घ्या…
युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाआधी विराटने आपल्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण विराट कोहलीला टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नको असं सांगितलं असं स्पष्टीकरण दिलं. परंतू विराटने सौरव गांगुलीचं हे वक्तव्य खोटं ठरवून एका अर्थाने थेट बीसीसीआय अध्यक्षालाच आव्हान दिलं होतं.
आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटने आपल्याला वन-डे संघाचं कर्णधारपद सांभाळायचं होतं असं सांगितलं. परंतू संघनिवडीच्या बैठकीत सर्वात शेवटी आपल्याला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या निर्णयाबद्दल सांगण्यात आलं. हा निर्णय त्यांनी का घेतला असेल याचीही मला कल्पना असल्याचं विराट म्हणाला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं यशस्वी नेतृत्व केलेल्या विराटला आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकवून देता आली नव्हती.
आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर विराटने आपल्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय सध्या या विषयावर आस्ते कदम भूमिका स्विकारणार असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT